बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

मीरा बोरवणकरांच्या पुस्तकाचा अजित दादांना त्रास

अधून मधून / अतुल कुलकर्णी

 

मीरा बोरवणकरजी
जयहिंद

निवृत्तीनंतर लोक नातवंडांमध्ये मुलाबाळांमध्ये रमतात… फिरायला जातात… जग बघायचे राहिले असेल तर ते बघण्याचा प्रयत्न करतात… आपण विनाकारण पुस्तक लिहीत बसलात. हे नसते उद्योग कोणी सांगितले होते? पुस्तक लिहायचे तर आपल्याला आलेले चांगले अनुभव तरी लिहायचे… नको त्या गोष्टी लिहून आपण काय मिळवले..? राजकारणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांचे अत्यंत गंभीर साटेलोटे आहे असेही आपण पुस्तकात लिहिले. हे काय आजचे आहे का..? तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी असे बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणाले होते, हे आपण विसरलात का..? आधीच आमचे दादा काकांपासून दूर गेल्यामुळे दुःखात आहेत. त्यात तुम्ही पुस्तक लिहिले. तुमच्या पुस्तकाचा उगाच आमच्या दादांना त्रास...

पुण्यातला एखादा भूखंड जर देशप्रेमी बिल्डरला दिला असता तर काही बिघडले नसते. तुम्हाला आठवत असेल, गृह विभागाच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी मंत्रिमंडळासाठी बनवण्यात आलेल्या फाईल मध्ये, “मुंबईतले पोलीस झोपडपट्टी दादांच्या दयेवर अवलंबून राहतात”, असे लिहिले होते. पुण्यातले ही पोलीस असेच कुठेतरी राहिले असते… तर काय झाले असते..? त्या बिल्डरला जर तो भूखंड मिळाला असता, तर त्याने तिथे एखादी सेव्हन स्टार इमारत उभी केली असती. पुण्याच्या वैभवात त्या इमारतीने भरच घातली असती. पोलिसांना कार्यालय, घर कुठेही देता आले असते. पुण्यातल्या पुण्यात नोकरी करायला थोडे दुरून यावे लागले असते तर पोलिसांचे काय बिघडले असते..? एवढे करून इतक्या वर्षात त्या जागेवर काहीही झाले नाही. स्वतः करायचे नाही, आणि दुसऱ्यांना करू द्यायचे नाही हे योग्य आहे का..? मात्र आता पुस्तक लिहून उगाच आमच्या दादांना त्रास…

पुण्यातली ती जागा, त्या बिल्डरला मिळाली नाही म्हणून तुम्हाला निवृत्त होण्याआधी सीआयडीचे, गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पद दिले गेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, आपल्याला आघाडीचा धर्म पाळायचा आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसला नाराज करू शकत नसल्याची खंत व्यक्त केल्याचे आपण पुस्तकात लिहिले आहे का? पुस्तक इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला लवकर समजत नाही. मराठीत लिहिले असते तर कळाले असते. असो. आपल्यासारखे बाणेदार अधिकारी पोस्टिंग साठी हट्ट धरत नाहीत, असे आम्ही ऐकले होते. पण पुस्तकाच्या रूपाने वेगळाच तपशील उघड करून आपण नेमके काय साध्य केले माहिती नाही… मात्र उगाच आमच्या दादांना त्रास…

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मुंबईचे पोलीस आयुक्त केले होते. मुंबईत सतत काही ना काही घडत होते. त्यावरून आबांनी अधिकाऱ्यांची एक बैठक मंत्रालयात घेतली होती. त्या बैठकीत आबांनी, अहो, तुम्हाला एवढे मुंबईचे पोलीस आयुक्त केले… जरा मुंबईकडे लक्ष द्या… असे उद्विग्न स्वरात सांगितले, तेव्हा, त्या अधिकाऱ्याने, “मी थोडेच मला पोलिस आयुक्त करा असे सांगितले होते…?” या शब्दात आबांना ऐकवले. त्यावेळी त्यांना किती वाईट वाटले होते, हे तुम्ही तेव्हाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असणाऱ्या तुमच्यासारख्याच धाडसी महिला अधिकाऱ्यांना विचारू शकता… राजकारणात या गोष्टी होत असतात. आपण चांगल्या गोष्टी लिहायचे सोडून तुम्ही पुस्तकात नको त्या गोष्टी लिहीत बसलात… उगाच आमच्या दादांना त्रास…

औरंगाबाद मधील ५० एकरचा एक मोठा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचला असे आपल्याला जस्टीस मरलापल्ले यांनी मेसेजवर कळवल्याचे आपण पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट साठी असणारी जागा एका बिल्डरला हस्तांतरित करण्याकरता २०१३ ते २०१६ या काळात आपल्यावर केंद्रीय संस्थांनी दबाव आणल्याचा मेसेज एका अधिकाऱ्याने आपल्याला पाठवल्याचेही आपण सांगून टाकले. तेव्हापासून आम्ही धसका घेतला आहे. आम्ही पण दादांच्या चार चांगल्या गोष्टी मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार होतो. पण तुम्ही त्या आमच्या नावानिशी बाहेर सांगितल्या तर उगाच आम्हाला आणि आमच्या दादांना त्रास…

जाता जाता आमच्या पुण्यातल्या नीलमताईंना तरी तुम्ही सोडून द्यायचे होते. पुण्यात झालेल्या व्हायलेन्समध्ये त्यांच्या विरोधात एकदम मस्त पुरावा होता, असे आपण सांगितले, पुस्तकातही लिहिल्याचे समजते. असे आपण का करत आहात..? आमचे दादा आत्ता कुठे नव्या घरोब्यात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्ही लगेच स्थावर मालमत्तेचे प्रश्न उपस्थित करून त्यांची अडचण का करता..? मागेही असेच मुंबईच्या विकास आराखड्यातील २८५ भूखंडांच्या श्रीखंडाचे प्रकरण गाजले होते. तेव्हा “भूखंडाचे श्रीखंड” हा शब्दप्रयोग तेव्हाच्या शिवसेनेत असणाऱ्या, नंतर राष्ट्रवादीत गेलेल्या, आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या छगन भुजबळ यांनी केला होता. महाराष्ट्राला त्यांनी दिलेले हे नवे शब्द धन तुम्हाला दिसले नाही का..? तुम्ही देखील असेच काही शब्दप्रयोग करायला हवे होते. म्हणजे विषय दुसरीकडे गेला असता, आणि त्याचा नाहक त्रास आमच्या दादांना झाला नसता..

आता हे पुस्तक मराठीत आणा. म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना तुम्ही नेमके काय म्हणत आहात आणि पुस्तक न वाचता लोक काय बोलत आहेत यातला फरक शोधता येईल. मराठीत पुस्तक येईल तेव्हा मात्र आमच्या दादांना त्रास होईल असे काही करू नका. हे शुद्ध मराठीत म्हणजे ॲडव्हान्स मध्ये सांगून ठेवतो. या पुस्तकाच्या निमित्ताने जी चर्चा घडवून आली त्यातून आपला हेतू साध्य झाला आहे असे म्हणायला हरकत नाही, तरीही पुस्तकाच्या निमित्ताने एक चर्चासत्र पुण्यातच घडवून आणले तर… कोणाला पाहुणे म्हणून बोलवायचे? आत्ताच सांगून ठेवा, म्हणजे तारखा घेता येतील… नाहीतर नकोच… पुण्यात तर बिलकुल नको… उगाच आमच्या दादांना त्रास…
तुमचाच बाबुराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *