रविवार, २२ डिसेंबर २०२४
22 December 2024

मिलिंद देवरा, बरे झाले आपण काँग्रेस पक्ष सोडला…

अधून मधून / अतुल कुलकर्णी

 

प्रिय मिलिंद देवरा अभिनंदन!

काँग्रेस पक्ष सोडून वेगळी वाट धरली, त्यासाठी आपले कौतुक करावे तेवढे थोडे. आपले वडील मुरली देवरा यांची मोठी पुण्याई होती. मुंबई काँग्रेस म्हणजे मुरली देवरा आणि मुरली देवरा म्हणजे मुंबई काँग्रेस असे समीकरण होते. याचा अर्थ त्यांच्यानंतर काँग्रेस म्हणजे मिलिंद देवरा असे समीकरण व्हायलाच हवे का..? जे कोणी आपल्यावर टीका करत आहेत ते वेडे लोक आहेत. वडिलांची आणि आपली बरोबरी कधी होईल का? मात्र, उगाच आपल्याला बदनाम करण्यासाठी काँग्रेसचे नेते असे उद्योग करत असावेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून आपण २००४ मध्ये भाजपच्या तुल्यबळ नेत्या जयवंतीबेन मेहता यांना पराभूत केले. त्यावेळी आपल्या लोकसभा मतदार संघातून ॲनी शेखर, सय्यद अहमद, अमीन पटेल, भाई जगताप असे काँग्रेसचे चार आमदारही निवडून आले. त्यावेळी तो विजय आपल्या पिताजींमुळे झाला, असे सांगितले गेले. त्यामुळे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण मोहन रावले यांना पराभूत केले. त्यावेळी ॲनी शेखर, अमीन पटेल आणि मधु चव्हाण हे तीन आमदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. यात आपला काहीच वाटा नव्हता, असे म्हणून कसे चालेल..? सलग दोन वेळा निवडून आल्यानंतर दोन वेळा आपला पराभव झाला, तर बिघडले कुठे? मोदी लाटेत भलेभले पडले. तिथे आपण पडलो त्यात विशेष काय? मात्र, दोन वेळा पराभूत झाल्यानंतर तरी काँग्रेसने आपल्याला राज्यसभेवर घ्यायला काय हरकत होती..? महाराष्ट्राबाहेरच्या नेत्यांना राज्यसभेवर पाठवले आणि आपल्याला तसेच ठेवले, हे काही बरोबर नाही.

२०१४ ला आपण पराभूत झालो. आपल्या लोकसभा मतदारसंघात फक्त एक जागा विधानसभेची निवडून आली. २०१९ ला देखील आपण पराभूत झालो. त्याही वेळी आपण विधानसभेची एक जागा आपण निवडून आणली ना… मात्र काँग्रेसवाल्यांना आपले हे यश दिसत नाही. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरूपम होते. तेव्हा त्यांना त्या पदावरून दूर करण्यासाठी आपल्याला किती कष्ट करावे लागले. त्या कष्टाची कसलीही नोंद काँग्रेस पक्षाकडे नाही. आपल्या एवढ्या कष्टानंतर निरूपम यांना पक्षाने मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून दूर केले. २६ मार्च २०१९ रोजी आपली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आपण लगेच मे २०१९ मध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इतक्या कमी कालावधीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्याचा नावलौकिक आपल्या नावावर आहे. मात्र, हा विक्रम काँग्रेसवाले ठार विसरून गेले. म्हणूनच ते आता आपल्यावर टीका करत आहेत. आपण चिंता करू नका. अशा टीकांकडे दुर्लक्ष करायला शिका… आपल्यावर येत्या काळात अशा अनेक टीका होतील. लोक जुन्या गोष्टी उकरून काढतील. राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याच्या नियोजनाची सगळी जबाबदारी आपल्यावर सोपवली होती, पण आपण ती जबाबदारी सोडून दिली, ते बरे झाले. अशा जबाबदाऱ्या घेण्यासाठी आपण आहोत का? आपल्याला राज्यसभा, लोकसभा मिळायला हवी. ते आपले लक्ष्य आहे. कुठे या असल्या छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या घेत राहायचे..? दीड महिन्यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहखजिनदार म्हणून आपली नियुक्ती केली होती. मात्र, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिला. हातात टोकदार धनुष्यबाण घेतला… ते बरे झाले..! किती काळ आपण दुसऱ्यांसाठी पैसे गोळा करायचे..? आपल्यालाही मुलं, बाळ, संसार आहे.

आपल्यालाही पैसे गोळा करावे लागतात… म्हणजे कमवावे लागतात… काँग्रेसवाल्यांना हे कसे लक्षात येत नसेल..? एका अर्थाने जे झाले ते बरे झाले. उगाच दुसऱ्याच्या दिवाळीला आकाश दिवे का करायचे..? आपण कायम मालकी थाटाने राहायला हवे. अशा किरकोळ जबाबदाऱ्या घेण्यासाठी आपण थोडेच आहोत..? पण हे काँग्रेसवाले आगाऊ आहेत. ते मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी, आपल्याला अशी जबाबदारी देतात. आम्ही तुमच्यासाठी किती केले असे दाखवतात. आपल्याला मालक म्हणून राहायची सवय झालेली आहे. आपण लोकांना जबाबदाऱ्या द्यायच्या की, लोकांनी दिलेल्या जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या..? त्यामुळे तुम्ही जे केले ते अतिशय योग्य केले..!

आपण कायम कॉर्पोरेट कल्चरमध्ये राहिले पाहिजे. आपण काय केले हे आपणच सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कोणत्याही टीकेकडे लक्ष देऊ नका. आपले लक्ष दिल्ली आहे. त्यामुळे मुंबईतल्या मतदारसंघातल्या किरकोळ नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे, पत्रकारांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. आपल्या ओळखी वरच्या पातळीवर असायला हव्यात. खालचे लोक चुपचाप आपल्यासोबत येतात… हे तुम्ही तुमच्या आत्तापर्यंतच्या कार्यपद्धतीवरून दाखवून दिले आहेच… ते असेच पुढे चालू ठेवा. मग बघा, आपली कशी भरभराट होते..! जाता जाता आपल्यासोबत नसीम खान आणि अमीन पटेल यांनादेखील घेऊन जा. ते बिचारे आपल्याविना इकडे एकटे पडतील, असे वर्षाताई गायकवाड कोणाला तरी सांगत होत्या… तुम्हाला माहिती असावे, म्हणून सांगितले. बाकी ठीक. आपल्याला खूप खूप शुभेच्छा! –

आपलाच

बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *