या काँग्रेसचं करायचं काय?
धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं… जेष्ठ नेत्यांची अवस्था
वृत्तविश्लेषण / अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुरुवारी दोन घटना घडल्या. मालेगावमध्ये काँग्रेसच्या सर्व २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी पक्षाच्या बैठकीची आपल्याला सूचनाच दिलेली नाही म्हणून नाराज उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यांना समाजवून सांगण्याचे व परत बैठकीत आणण्याचा मोठेपणा एकाही नेत्याने दाखवला नाही.
नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेले यश पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढवणारे आहे. सत्तेत नसताना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्याही जागा काँग्रेसला टिकवता आलेल्या नाहीत. त्यातच पक्षाचे काही नेते बेताल आणि वाट्टेल ते बोलण्यासाठीच प्रसिध्द होऊ लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसला राज्यात वाचवणार कोण? असा प्रश्न पक्षातल्याच ज्येष्ठ नेत्यांना पडला आहे. पण बोलायचे कोणी, आणि बोललो तर ऐकणार कोण? असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
विदर्भात चांगली कामगिरी केल्याचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दावा अर्धसत्य सांगणारा आहे. कारण प्रदेशाध्यक्षांच्या नागपूर विभागात काँग्रेसच्या जागा १५४ वरून १४१ वर आल्या. त्यातही ९२ जागा एकट्या मंत्री विजय वडेट्टीवार यांचा प्रभाव असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून आल्या आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या भंडारा जिल्ह्यात १४ जागांची घट झाली आहे. पूर्वी त्या २४ होत्या, आता १० झाल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगर पंचायतची सत्ता काँग्रेसने गमावली. पूर्वी काँग्रेसचे १२ नगरसेवक होते. ते आता २ झाले. काँग्रेसच्या एकूण ३४४ जागांपैकी २२४ जागा सात जिल्ह्यातून आल्या आहेत. चंद्रपूर – ५३, गडचिरोली – ३९, यवतमाळ – ३९, नांदेड – ३३, लातूर – २३, वर्धा – २१, बुलढाणा – १६ उर्वरित २५ जिल्ह्यात १२० जागा आहेत. शिवसेना चौथ्या क्रमांकाला असली तरी त्यांच्या जागांमध्ये ९२ जागांची सर्वात मोठी वाढ झाली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक फायदा शिवसेनेचाच झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्याही जागा वाढल्या. चार प्रमुख पक्षांमध्ये फक्त काँग्रेसच कमी झाली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बोलण्यावर ज्येष्ठ नेते खाजगीत टीका करतात. अध्यक्ष हा वैचारिक भूमिका घेणारा, मोजकेच पण टोकदार बोलणारा असावा असे सांगतात. ते कमी बोलतील तर पक्ष त्यांना गांभीर्याने घेईल असे सांगतात पण हे उघडपणे पटोलेंना सांगण्याची हिंमत कोणी दाखवत नाही. शिवसेनेत उद्वव ठाकरे, राष्ट्रवादीत शरद पवार, अजित पवार आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही. मात्र काँग्रेसमध्ये राज्यात असा एकही नेता नाही. काही एवढे बोलतात की त्यांचे बोलणे कोणी गांभीर्यानेच घेत नाही आणि कोणी काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्याची कोणी दखलच घेत नाही अशी अवस्था पक्षाला उभारी देणारी नाही.
नाना आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद पक्षाला राज्यात अडचणीत आणण्याचे काम करत आहे पण त्यावर मध्यस्थी करण्याची कोणाची तयारी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने गोव्यात एकत्र येऊन पुढची दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे पक्षात जर असेच चालू राहीले आणि दिल्ली काहीच हस्तक्षेप करणार नसेल तर आम्हाला नाईलाजाने राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत आमच्या मतदारसंघांच्या सोयीनुसार जावे लागेल असेही आता काही नेते बोलून दाखवत आहेत.
Comments