मिशन पालकमंत्री अन् काँग्रेसची शांतता
मुक्काम पोस्ट महामुंबई/ अतुल कुलकर्णी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आणि ते दाओसला निघून गेले. त्यांची ही एक वेगळी कार्यपद्धती आहे. या आधी मुख्यमंत्री असताना मोठ्या बदल्या किंवा असे निर्णय जाहीर करून ते परदेश दौऱ्यावर गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. पालकमंत्र्यांची यादी पाहिली, तर भाजपने आता सगळे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रित केल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना, त्यांना सत्तेचा वाटा देताना त्यांचे महत्त्व तर राहिले पाहिजे, मात्र त्याचा फारसा उपयोग होता कामा नये, याकडे त्यांनी लक्ष दिल्याचे स्पष्ट आहे.
ठाणे जिल्ह्यात विधानसभेत भाजपचे ९, शिंदे सेनेचे ६ आणि शरद पवार, अजित पवार व समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एकेक आमदार आहेत. त्याशिवाय जिल्ह्यात शिंदे सेनेचे २ आणि शरद पवार गटाचा १ खासदार आहे. ठाणे जिल्ह्यात ६ महानगरपालिका आणि २ नगरपालिका आहेत. त्यात भाजपचे २१४ नगरसेवक, तर शिवसेनेचे २६० नगरसेवक होते. २६० पैकी फार कमी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या पातळीवर जरी भाजप आणि शिंदे सेना एकसारखी दिसत असली, तरी पालिका बरखास्त होऊन तीन वर्षे होत आले आहेत. भाजपने सर्वत्र पन्नास टक्के नवे चेहरे देण्याची भूमिका घेतली आहे. हे पाहता या संख्या बळाला तसाही फारसा अर्थ उरणार नाही. त्यामुळे जरी ठाण्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले असले, तरी ठाण्यातील भाजप नेत्यांनी स्वबळाच्या नाऱ्याचा शिंदे सेनेच्या आमदारांनी महायुतीचा आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली आहे. यावरूनच राजकीय चित्र लक्षात येते.
रायगड जिल्ह्यात शिंदे सेना ३, भाजप २ आणि अजित पवार राष्ट्रवादी, शेकाप प्रत्येकी १, असे आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीच्या गोटातून आदिती तटकरे, तर शिंदे सेनेतून भरत गोगावले मंत्री झाले आहेत. आपल्याला पालकमंत्रीपद मिळणारच, असे भरत गोगावले सांगत होते. मात्र, शिंदे सेनेचे संख्याबळ जास्त असूनही जिल्ह्यात एकच आमदार असणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाला रायगडचे पालकमंत्रीपद दिले आहे. याचा अर्थ भाजपला रायगड जिल्ह्यात स्वतःचा बेस तयार करायचा आहे. त्यासाठी त्यांचे पहिले लक्ष्य शिंदेंच्या शिवसेनेकडे असेल, असा तर्क लावला जात आहे. दरम्यान, आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे.
पालघरमध्ये भाजपचे ३, शिंदे सेनेचे २ आणि माकपचा १, असे आमदारांचे संख्याबळ आहे. पालघर जिल्ह्यात हितेंद्र ठाकूर गटाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात जशास तसे उत्तर देऊ शकणारे मंत्री गणेश नाईक यांच्याकडे भाजपने पालकमंत्री पद दिले आहे. पालघरच्या दिशेने गणेश नाईक, कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ठाण्यातून भाजपच्या ११ आमदारांची कुमक अशी मोर्चे बांधणी ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी केल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे, तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री पद आशिष शेलार यांना दिले आहे. त्यांच्यासोबत सह पालकमंत्रीपद तयार करून ते भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आले आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातील राजकीय संख्याबळ बघितले, तर अनेक राजकीय प्रश्नांची उत्तरे मिळतील. मुंबई शहराचे पालकमंत्री २ खासदार, १० आमदार यांच्यासह ५६ नगरसेवकांचे प्रतिनिधीत्व करतात. उपनगराचे पालकमंत्री ४ खासदार, २६ आमदार आणि १७१ नगरसेवकांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळेच भाजपने उपनगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करत दोन मंत्र्यांना पालक आणि सह पालकमंत्री केले आहे. पालकमंत्री पदाला झालेला विलंब आणि त्या मागचे राजकीय आराखडे पाहिले, तर वस्तुस्थिती लक्षात येईल.
भाजपने ही अशी तयारी केलेली असताना, काँग्रेसमध्ये सगळे काही शांत शांत आहे. मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगारही दिले गेलेले नाहीत. ही चर्चा झाल्यावर प्रदेश काँग्रेसने दोन महिन्यांचा पगार दोन दिवसांपूर्वी दिला. मुंबई काँग्रेसमधील कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले नसल्याच्या तक्रारी आहेत, मात्र कोणी स्पष्टपणे बोलायला तयार नाही. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यंतरी भाजपने हल्ला केला, तेव्हा झालेली मोडतोड अजून दुरुस्त करायला पक्षाला वेळ मिळालेला नाही. मात्र, मुंबई काँग्रेस बद्दलच्या बातम्या जाणीवपूर्वक आमच्याच पक्षातले नेते पसरवत आहेत, असा आक्षेप विद्यमान अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांचा आहे. हा आक्षेप खरा जरी असला, तरी मुंबई काँग्रेस महापालिका निवडणुकीच्या मोडवर गेल्याचे कुठलेही चित्र नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष बदलण्याच्या चर्चा विधानसभा निकालानंतरच सुरू झाल्या. पण, त्यालाही मुहूर्त लागलेला नाही. अध्यक्ष बदलणार की नाही, हे दिल्ली स्पष्टपणे सांगत नाही. त्यामुळे कार्यकर्ते, नेते संभ्रमात आहेत. मुंबई, ठाण्यात मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणती भूमिका घेणार, यावर बरीच राजकीय गणिते समोर येतील. तूर्तास एवढेच.
Comments