बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

डान्स बारमध्ये पैसे उधळायला… चलो पनवेल…!

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

कधी काळी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टापर्यंत तो लढवला. तरुण पिढी घरदार विकून, शेती विकून डान्स बारमध्ये पैसे उधळत होती. ते थांबावे, यासाठी आर. आर. यांनी प्रचंड विरोध पत्करून तो निर्णय अंमलात आणला होता. मात्र, त्याच आर. आर. यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी पक्षाचा एक गट आता भाजप शिवसेनेसोबत सत्तेत आहे. त्यांना मात्र सध्या सुरू असलेल्या डान्स बारविषयी काहीही म्हणायचे नाही, यासारखे दुर्दैव नाही.

पनवेल परिसरात चक्कर मारली तरी रस्त्याच्या दुतर्फा डान्स बार दिसतील. डान्स बारच्या बाहेर ‘लाइव्ह ऑर्केस्ट्रा’ असे नाव लिहिलेले दिसते. प्रत्यक्षात आतमध्ये पूर्वीच्या काळी जसे डान्स बार चालायचे, तसेच आजही सुरू आहेत. वय वर्षे १९ ते २० पासून ३० वर्षांपर्यंतच्या २०-२५ मुली फ्लोअरवर डान्स करत असतात. लोक त्यांच्यावर पैसे उधळतात, हे चित्र या भागात रोजचे झाले आहे. अशा प्रकारच्या डान्स बारना बंदी असतानाही ‘लाइव्ह ऑर्केस्ट्रा’च्या नावाखाली हे राजरोस सुरू आहे.

पनवेल तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत ८ ऑर्केस्ट्रा बार, २ सर्व्हिस बार, तर पनवेल शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ५ सर्व्हिस बार आणि ४ ऑर्केस्ट्रा बार आहेत. कळंबोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत ३ बार तर तळोजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत २ बार आहेत. या सर्व बारमध्ये मिळून एका रात्रीची उलाढाल ४० ते ५० लाख रुपयांच्या घरात आहे. काहींच्या मते शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवसांत ही उलाढाल ७० ते ८० लाखांपर्यंत जाते. यातल्या ‘क्रेझी बॉय बार’वर आतापर्यंत चारवेळा पोलिसांनी कारवाई केली. लाखो रुपये ताब्यात घेतले. मात्र, ही कारवाई म्हणजे भाव वाढवून घेण्याची कारवाई असल्याचे या भागातील लोकांचे म्हणणे आहे.

नियमितपणे यंत्रणेतल्या सगळ्यांना हप्ते देतो. मात्र, अधूनमधून त्यांना जास्तीचे पैसे हवे असले की ते कारवाया करतात. सेक्शन गरम आहे असे सांगतात आणि आमच्याकडूनच जास्तीचे पैसे घेतात, असेही हे लोक सांगतात. लेडीज सर्व्हिस बार सुरू ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसांपासून ते सीपी युनिटपर्यंत प्रत्येक महिन्याला हप्ते द्यावे लागतात, असेही सांगितले जाते. पनवेल परिसरात लॉजिंग बोर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ६२५ च्या घरात आहे. अशा खोल्यांमधून काय चालते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यंत्रणेत सगळ्यांना जर पैसे दिले गेले नसते, तर अशा अवैध धंद्यांवर वेळीच कारवाया झाल्या असत्या. ज्या अर्थी या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, याचा अर्थच कुठेतरी पाणी मुरते आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर १७ ते २०, कळंबोली ते मुंब्रा रोडवर ७ ते १० ढाबे आहेत. तसेच कामोठे, खारघर, कळंबोली, रोडपाली, खांदा कॉलनी भागात जवळपास शंभरहून अधिक अनधिकृत ढाबे असून, या ढाब्यांवर अवैध पद्धतीने दारू विक्री रोजची झाली आहे. या ठिकाणी रात्री बैठक पद्धतीने दारूच्या नावाने जे काही चालू असते ते अत्यंत भयंकर आहे. हे अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक ढाबा व्यावसायिकाला राजकारणी ते पोलिस असे वरपर्यंत हप्ते द्यावे लागतात. राज्य उत्पादन शुल्क विभागही आपल्या हप्त्याची वसुली व्यवस्थित करतो, असे या भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय १५ ते २० सोशल क्लबमधून तीन पत्ती, काला पिला, डॉग डॉग असे पत्त्यांचे खेळ रोख पैशांवर खेळवले जात आहेत. या खेळाकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित आहे. ज्याच्या हातात अवैध मार्गाने आलेले पैसे आहेत असा वर्ग मोठ्या प्रमाणावर डान्स बारकडे गर्दी करताना दिसत आहे. हे एवढे सगळे अवैध धंदे कोणाचा तरी सक्रिय पाठिंबा असल्याशिवाय चालूच शकत नाहीत. पूर्वी डान्स बारमध्ये ज्या पद्धतीने मुली आणल्या जायच्या, तोच प्रकार आता पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. या भागात अपार्टमेंटमधून अशा मुलींची राहण्याची व रात्री डान्स बारमध्ये आणण्याची सोय केली जाते. एक मोठी अर्थव्यवस्था या सगळ्यांच्या मागे काम करत आहे. काही डान्स बारमध्ये तर क्रेडिट कार्ड देत बिले भरली जातात, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नोटा उधळल्या जातात. वरपर्यंत हात असणारे राजकारणी आले की त्यांची वेगळी सोय केली जाते. हुक्का पार्लरच्या नावाखाली कामोठे, कळंबोली औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येकी एक ते दोन हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. डान्स बारच्या तुलनेत यातून मिळणारी कमाई कमी असली तरी हे सगळे धंदे बेकायदा सुरू आहेत.

काही महिन्यांपूर्वी नायजेरियन तस्करांकडून ड्रग्ज खरेदी-विक्रीचा भंडाफोड पोलिसांनी केला होता. हा संपूर्ण परिसर ड्रग्ज माफियांचे केंद्र बनू पाहत होता. त्या कारवायांनंतर पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात ज्या पद्धतीने ड्रग्ज सापडत आहेत, ते पाहता आता त्या भागातही हातपाय पसरले गेल्याचे दिसत आहे. नवी मुंबईत विमानतळ येऊ घातले आहे.

अटल सेतूमुळे या परिसराचा रोड मॅपच बदलला आहे. अशा परिस्थितीत या भागात ज्या पद्धतीने अवैध धंद्यांचे जाळे विणले जात आहे ते वेळीच रोखले पाहिजे, अन्यथा काही वर्षांपूर्वी मुंबईत ज्या पद्धतीने अंडरवर्ल्डने आपले हातपाय पसरले होते, तशीच परिस्थिती या संपूर्ण परिसराची व्हायला वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *