आजपासून सात दिवस, सात रात्री जागते रहो…
मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील ११ जागांचे मतदान आज पार पडेल. देशाचा चौथा टप्पा आणि महाराष्ट्राचा शेवटचा टप्पा २० मे रोजी पूर्ण होईल. येत्या सोमवारी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि मुंबईमधील ६ लोकसभा मतदारसंघांचे मतदान होईल. सोमवारनंतर महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचे लक्ष एवढ्याच भागावर केंद्रित असेल. या जागा जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी सर्वस्व पणाला लावतील. कारण मुंबईवर कोणाचे वर्चस्व, हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. त्याचे पडसाद देशभर उमटतात.
मुंबईत निवडून येणाऱ्या पक्षाचे केंद्रात सरकार येते, असाही आजवरचा समज आहे. एके काळी मुंबईत काँग्रेसचे पाच आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आलेला आहे. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, नंतर ही परिस्थिती बदलली. भाजपचे ३ आणि शिवसेनेचे ३ खासदार निवडून आले. तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार होते. आता भाजप आणि शिंदेसेनेने प्रत्येकी ३ उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाने ४ ठिकाणी आणि काँग्रेसने २ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळेच भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर वर्चस्व मिळवणे टॉप प्रायोरिटीचे काम असेल.
राज्यातल्या १३ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका वगळल्या, तर उर्वरित महाराष्ट्राचे मतदान आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. भाजपने त्यांचे इतर राज्यांतील मुख्यमंत्री, बडे नेते, राज्यातले मंत्री आणि प्रमुख नेते यांना रविवारपासूनच मुंबईच्या मैदानात उतरवले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालचा रविवार मुंबईत प्रचार करण्यात घालवला. सोमवारपासून मुंबईत अनेक केंद्रीय मंत्री येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुंबईत महायुतीच्या वतीने सभा होईल. ही सभा मनसेने आरक्षित केलेल्या शिवाजी पार्कवरील मैदानात होईल. महाविकास आघाडीचीदेखील मुंबईत १७ तारखेला सभा होईल.
महायुती आणि महाविकास आघाडी, दोघांचीही सभा एकाच दिवशी झाली, तर १७ तारखेला मुंबई खऱ्या अर्थाने जाम होईल. काँग्रेसनेदेखील त्यांच्या त्यांच्या राज्यातील नेत्यांना, तसेच महाराष्ट्रातून अन्य जिल्ह्यांतील नेत्यांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येकाला मतदारसंघ वाटून दिले जाणार आहेत. उद्धवसेना मुंबई ४ जागा लढवत असली, तरी काँग्रेसच्या नेत्यांना हे मतदारसंघ वाटून दिले जातील. त्यांना त्या – त्या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे यांची मशाल पेटविण्याचे काम करायचे आहे, तर दोन लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेने काँग्रेसचे हात बळकट करण्याचे काम सुरू केले आहे. मुंबईत निवडणुकीच्या तोंडावर मराठी, गुजराती वाद उफाळून येईल, असे सांगितले जात होते. तेच चित्र आता दिसत आहे. तसे झाले तर आधीच मुस्लिम आणि दलित मतदार भाजपसोबत जायला तयार नसल्याचे चित्र रंगवले जात असताना, हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. हा वाद अधिक पेटू नये म्हणून भाजपकडून जेवढे प्रयत्न सुरू आहेत, तेवढेच दुसऱ्या बाजूने हा वाद चिघळविण्याचेही प्रयत्न चालू आहेत. या वादाचा परिणाम मुंबईच्या ६ मतदारसंघांवर होऊ शकतो. ६ लोकसभा मतदारसंघात कोणाचे किती मतदार आहेत, याची आकडेवारी भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याने तयार केली होती.
निवडणुका एक दिवसाच्या होतील. जर हा वाद वाढला आणि त्याचे परिणाम मतदानावर झाले, तर मात्र मराठी आणि गुजराती समाजात या निमित्ताने जी तेढ निर्माण होईल, ती पुढे अनेक वर्षे कायम राहील. राज ठाकरे यांच्या मनसेने नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत गुजराती मतदारांची बाजू घ्यायची की मराठी? हा प्रश्न जसा अडचणीचा ठरला आहे, तसाच भाजपने राज ठाकरे यांची मदत घेऊन उत्तर भारतीयांना नाराज करायचे का? हा प्रश्न आहे. त्यामुळे मुंबईची निवडणूक या आठवड्यात एका वेगळ्या टप्प्यावर गेलेली पाहायला मिळेल.
शिंदेसेनेच्या अनेक आमदारांना विधानसभेत उमेदवारी मिळेल का? आणि मिळाली तर आपण निवडून येऊ का? हा प्रश्न आहे. पैशानेच सगळे प्रश्न मिटतील, असे नाही. त्यामुळे मतदारांची नाराजी आपण ओढवून घ्यायची का? हा प्रश्न त्यांना सध्या सतावत आहे. खरे – खोटे माहिती नाही. मात्र, आत्तापासूनच शिंदेसेनेच्या काही आमदारांनी, आम्ही पडद्याआड तुमचेच काम करतो. विधानसभेच्या वेळी आम्हाला तुमच्यात घ्या, अशी गळ उध्दवसेनेला घातल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे या निवडणुकीत समोर दिसणाऱ्या प्रचारसभा, रॅली, भेटीगाठी, कॉर्नर मीटिंग या पलीकडे पडद्याआड होणाऱ्या बैठका आणि मतांचा केला जाणारा ‘बंदोबस्त’ या आठवड्यात शिगेला पोहोचेल. या गोष्टींसाठी २४ तासांचा दिवस आणि वैऱ्याची रात्र अशी स्थिती आहे.
ठाणे, कल्याण आणि भिवंडी या ३ लोकसभा मतदारसंघात गुजराती, मराठी असा वाद नसला, तरी त्या ठिकाणी त्यांचे स्थानिक प्रश्न वेगळेच आहेत. या तीन ठिकाणी मिळून मुंबईच्या खालोखाल ६५ लाख मतदार आहेत. धाराशीवमध्ये मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ एका कार्यकर्त्याचा खून झाला. या पार्श्वभूमीवर पाहिले तर मुंबई, ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून दगडफेक, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, राडेबाजी असे प्रकार सुरू झाले आहेत. हा आठवडा हे दहा लोकसभा मतदारसंघ सुशासनात कसे राहतील, ही मोठी जबाबदारी पोलिस दलाला पार पाडायची आहे. जर का या निवडणुकीत दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्या, तर त्याचे पडसाद विधानसभेला आणखी तीव्रपणे समोर येतील, हे सांगायला ज्योतिषाची गरज लागणार नाही. या राडेबाजीच्या भीतीपोटीच अनेक लोक मतदानाला बाहेरही पडणार नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत.
आपापल्या गावी जाणाऱ्यांच्या गाड्या हाऊसफुल्ल आहेत. मध्यंतरी रेल्वेने बुकिंग ओपन केले आणि सगळ्या गाड्या काही क्षणात हाऊसफुल झाल्या होत्या. हे पाहता मतदानाचा टक्का वाढवणे आणि राडेबाजीही होऊ न देणे हे काम प्रशासनाला करायचे आहे.
मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत ९६,५३,१०० एकूण मतदार
ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ ९६,५३,१०० एकूण मतदार
Comments