शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

स्वप्ननगरीतले तरुण-तरुणी उघड्यावर प्रेम करतात तेव्हा…


मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी / 4 ऑगस्ट 2024

सपनोंका शहर, देशाची आर्थिक राजधानी, बॉलीवूड, सांस्कृतिक केंद्र, सगळ्यात मोठी फिल्मसिटी अशी अनेकांगी ओळख असणाऱ्या या शहरात तरुण-तरुणींना प्रेम करायला जागाच नाही. त्यामुळे तरुण मुलं मुली समुद्राकडे तोंड करून बसतात. छत्रीच्या छताखाली समुद्राच्या साक्षीने प्रेम करतात. एकमेकांच्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवतात. कधी ऊन तापले की त्यांचा स्वप्नभंग होतो… कधी धो धो पाऊस त्यांच्या स्वप्नांवर पाणी टाकतो… अनेकदा लाटा उसळल्या की मुंबईकरांनी दिलेला कचरा समुद्र साभार परत करतो. तेव्हा तर या स्वप्नवेड्या तरुणांना किनाऱ्यावर बसायलाही जागा मिळत नाही.

न्यूयॉर्क येथे सेंट्रल पार्क आहे. तिथले सौंदर्य, तिथे तयार करण्यात आलेले तलाव, पक्षी निरीक्षण केंद्र… या सगळ्यांच्या पलीकडे आबालवृद्धांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना हवी असणारी शांतता आणि प्रत्येकाला हवी असणारी त्याची स्वतःची स्पेस सेंट्रल पार्क सगळ्यांना देते. आपल्याकडे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. बोरिवली ते घोडबंदर असे १०४ चौरस किलोमीटर एवढ्या जागेत हे जंगल पसरलेले आहे. ३० सेंट्रल पार्क बसू शकतील इतके अवाढव्य असे हे जंगल आहे. न्यूयॉर्कमध्ये सेंट्रल पार्क उभे करावे लागले. आपल्याकडे निसर्गानेच इतके अप्रतिम जंगल दिले आहे. मात्र याचा एखादा भाग सेंट्रल पार्क सारखा विकसित करावा असे कधीही कोणाला वाटलेले नाही. महालक्ष्मी रेस कोर्स वर असे पार्क उभे करण्याची योजना आहे मात्र त्याच्या उभारणीच्या हेतूविषयी इतके प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या गेल्यात. चाळीत राहणारे, दीड दोनशे, अडीचशे फुटाच्या जागेत आपला संसार उभा करणारे लोक त्या घरात राहतील कसे आणि प्रेम करतील कधी..? या गजबजलेल्या महानगरात, जिथे प्रत्येक मोकळी जागा अमूल्य, तिथे प्रेमिकांसाठी एकांताची जागा कोण देणार? अशा परिस्थितीत, समुद्रकिनाऱ्यांवर प्रेम करणे हाच एकमात्र पर्याय उरतो.

मरीन ड्राईव्ह. “क्विन्स नेकलेस” म्हणून ओळख असणाऱ्या या किनाऱ्यावर दिवस-रात्र एकटेपणा घालवणाऱ्यांपासून ते तरुण तरुणी पर्यंत अनेक जण २४ तास बसलेले दिसतात. अंदाजे ३० हजार लोक रोज इथे भेट देतात. जुहू बीच प्रसिद्ध आणि गजबजलेला समुद्रकिनारा. एका सर्वेक्षणानुसार इथे रोज ५० हजार लोक भेट देतात. प्रेमी युगालांना हवा तो एकांत इथे मिळतो पण पोलीस इथे कायम त्यांच्यावरच वॉच ठेवून असतात… गिरगाव चौपाटीचा खुला समुद्रकिनारा, ओहोटीच्या काळात समुद्राच्या आत जाऊन बसायला मिळणारा आनंद, त्यामुळे रोज २५ हजार लोक या ठिकाणी भेट देतात. तरुण-तरुणी कशाचीही परवा न करता इथे तासान तास बसलेले दिसतात. कोस्टल रोड मुळे वरळी सी लिंक वर बसण्यासाठी जागाच उरलेली नाही.

मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर असणारे बँडस्टँड प्रेमी जोडप्यांसाठी कायम आकर्षणाचे ठिकाण राहिलेले आहे. बँडस्टँडचा प्रोमेनेड सुमारे १.२ किलोमीटर लांबीचा आहे. दररोज सुमारे २०,००० लोकांना तो आकर्षित करते. एका सर्वेक्षणानुसार, बँडस्टँड हे मुंबईतील तरुणांच्या डेटिंगसाठी सर्वोच्च पसंतीचे ठिकाण आहे. त्यापैकी सुमारे ६५% तरुणांनी बँडस्टँडला त्यांच्या पहिल्या डेटसाठी निवडले आहे. याशिवाय कार्टर रोड, एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्या, रुईया कॉलेज ही देखील तरुणांसाठीची प्रेम व्यक्त करण्याची ठिकाणे. बांद्राकडून वरळीकडे येताना सी लिंकच्या डाव्या हाताला जे उद्यान विकसित केले आहे तेथे आणि त्याच्या रेलिंगवर अनेक तरुण-तरुणी आपली टू व्हीलर लावून छत्रीचे छत बनवून प्रेम करत भर उन्हात उभे असतात.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन या महानगरीत एखादे सुंदर, शांत उद्यान विकसित करावे, जिथे सर्व वयोगटाच्या लोकांना जाऊन बसता यावे, त्यांना एकमेकांची सुखदुःख वाटून घेता यावीत अशी कसलीही सोय आम्ही केलेली नाही. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख हळूहळू बकाल कोलकत्याच्या दिशेने तर होत नाही ना? याचा विचार राजकारण्यांनीच केला पाहिजे.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर रोज जवळपास १०० टन कचरा सापडतो. हायटाईड असेल त्यावेळी तर समुद्र देखील कितीतरी टन कचरा बाहेर टाकून देतो. आपल्या घरात कचरा न करणारे, ‘सब भूमी गोपाल की’ या न्यायाने मुंबईत दिसेल तिथे कचरा टाकत राहतात. पान, तंबाखू , गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारत राहतात. कोणालाही हे शहर स्वच्छ सुंदर ठेवावे असे का वाटत नसावे..?

कोस्टल रोडच्या नियोजनामध्ये तीन उद्यानांचा विचार केला आहे. या उद्यानांचे नियोजन करताना हा विचार ठेवला जाईल का..? याच महानगरीत राहणारे कवी मंगेश पाडगावकर यांनी एक कविता लिहून ठेवली आहे. या लेखाचा शेवट त्यापेक्षा वेगळा काय असू शकेल…
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं, करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की, व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?
त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं, करु दे की !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *