नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..!
अधून मधून / अतुल कुलकर्णी
प्रिय नानाभाऊ नमस्कार
आपल्याला पक्षकार्याच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी आपण केलेली मागणी वाचली. प्रदेशाध्यक्षपदावरून कोणी दूर करण्याआधीच आपण स्वतःहून दूर होण्याचा निर्णय घेतला हे बरे झाले. यामुळे आता आपण निवडून आलेल्या १६ आमदारांचे गटनेते होण्याचा मार्गही मोकळा करून घेतला आहे. कुठले का असेना, आपल्याकडे एक पद कायम असले पाहिजे. आपल्यानंतर जे प्रदेशाध्यक्ष होतील त्यांच्यासाठी कामाची संधी असायला हवी. नेमका हाच विचार करून आपण त्यांच्यासाठी जी अमर्याद संधी ठेवली आहे ती ‘स्काय इज द लिमिट’ सारखी आहे. त्यासाठीही आपले कौतुक करावे तेवढे थोडेच.
आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली. लोकसभेला आपण एवढे घवघवीत यश मिळवले. विधानसभेला जिथे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचे अंदाज चुकले, तिथे आपले अंदाज बरोबर येतील अशी अपेक्षा तरी कशी करायची… कोणी काहीही बोलले तरी तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका…
आता आपण कशा चुका केल्या हे सांगणारे अनेकजण पुढे येतील. आपण घेतलेल्या निर्णयानंतर आपल्याविषयी प्रत्येक जण वेगळे मत मांडत आहे. एक नेते म्हणाले, नानांनी कधी कोणाला विश्वासातच घेतले नाही. चार ज्येष्ठ नेत्यांना एकत्र बसवून त्यांच्याशी संवाद साधणे, स्ट्रॅटेजी ठरवणे अशा गोष्टी त्यांनी कधीच केल्या नाहीत. त्यांनी सगळा भर पक्षाच्या वेगवेगळ्या सेलवर दिला. मूळ पक्ष काय करतो आहे हे त्यांना कधी कळालेच नाही… ही विधाने कोणत्याही माजी प्रदेशाध्यक्षाला कधीही जोडता येतील अशी आहेत, असे बोलणारे भेटतील. त्यामुळे तुम्ही हे फारसे गांभीर्याने घेऊ नका…
लोकसभेसारखे विधानसभेतही यश मिळेल, असा नानांचा समज होता त्यामुळे त्यांनी पक्षवाढीकडे लक्ष दिले नाही. ज्याचा पक्षाशी संबंध नव्हता अशा लोकांच्या नेमणुका केल्या. जुन्या जाणत्या नेत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. विधानसभा निवडणुकीसाठी देशभरातून आलेल्या नेत्यांना जबाबदाऱ्या वाटून देणे, त्यांच्याशी संवाद ठेवणे अशा गोष्टी कधी घडल्याच नाहीत. ज्युनिअर लोकांना पुढे करून ज्येष्ठ नेत्यांना नाराज केले गेले. परिणामी ज्युनिअर लोकांना काम जमले नाही… आणि ज्येष्ठांनी काम केले नाही..! याची सगळी जबाबदारी नानांचीच होती, असेही एक नेता तावातावाने सांगत होता. तुम्ही ज्याला पद दिले नाही तोच हा नेता असावा. जर पद दिले असते तर तो असे बोलत फिरला नसता, असे बोलणारे भेटतील. त्यामुळे तुम्ही हे फारसे गांभीर्याने घेऊ नका…
‘आपले कार्यालय कायम आपल्यासोबत असायचे. आपण जिथे जाल तिथे आपले कार्यालय आपल्यासोबत जायचे. प्रदेश कार्यालयात कोणी बसतच नव्हते. आपल्याला फक्त मीडियासाठी बाइट लिहून देणारे हवे असायचे. चॅनलवाल्यांना बाइट दिला की पक्षकार्य झाले, असे तुम्हाला वाटत होते… कोणालाही जबाबदारींचे वाटप सुरुवातीपासून नीट केले गेले नाही. रमेश चेन्नीथला आल्यानंतर पक्षात थोडा जिवंतपणा आला. त्यांनी काम केले नसते तर एवढ्या ही जागा आल्या नसत्या…’ नाना, या अशा गोष्टी कोण सांगत असेल, हे तुमच्या लगेच लक्षात आले असेल… (नाही लक्षात आले तर प्रत्यक्ष भेटीत सांगेल) असे बोलणारे भेटतील. त्यामुळे तुम्ही हे फारसे गांभीर्याने घेऊ नका….
तुम्ही आता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील काँग्रेसचे पक्षनेते व्हा. प्रदेशाध्यक्षपद हे तुलनेने तुमच्यापेक्षा ज्युनिअर माणसाकडे जाईल असे बघा. म्हणजे पक्ष आणि विधिमंडळावर आपले पूर्ण वर्चस्व राहील. बाळासाहेब थोरात यांना प्रदेशाध्यक्ष करावे, अशी मागणी पक्षात जोर धरत आहे. बाळासाहेब वरिष्ठ नेते आहेत. ते प्रदेशाध्यक्ष झाले तर आपल्याला त्यांचे ऐकावे लागेल. पक्षातील अनेक नेते आजही बाळासाहेबांविषयी सहानुभूती बाळगून आहेत. त्यामुळे तसे न होणे आपल्या हिताचे आहे. उलट तरुणांना वाव दिला पाहिजे, असे म्हणून आपण एक-दोन तरुण नेत्यांची नावे सुचवा. राहुलजींना ते नक्की आवडेल. तसेही ते आपले ऐकतात असे आपणच सगळ्यांना सांगत असता… तेव्हा बाळासाहेबांचे नाव पुढे रेटले गेले, तरी तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका…
शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्यासोबत कसा वाद घालायचा हे तुम्ही विथ प्रॅक्टिकल महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे जागांसाठी आग्रह कसा धरायचा, हेही उभ्या महाराष्ट्राने आपल्याकडून शिकून घेतले आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून त्यांचा पक्ष कमी करणाऱ्या भाजपला आपण स्वतःचा पक्ष ही कसा कमी करायचा, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे… राज्याचा पक्ष कसा चालवावा याचा आदर्श आपण दाखवून दिला आहे. आपल्या पावलावर पाऊल टाकून चालणारा नेता महाराष्ट्रात काँग्रेसला वेगळीच उंची देईल, याविषयी आमच्या मनात शंका नाही… त्यामुळे त्याकडे पूर्ण लक्ष द्या. बाकी कोण काय बोलतात हे फारसे गांभीर्याने घेऊ नका…
– तुमचाच बाबूराव
Comments