मंगळवार, १४ जानेवारी २०२५
14 January 2025

एकदा वेगवेगळे लढून स्वत:ची ताकद बघितलीच पाहिजे

अधून मधून / अतुल कुलकर्णी

गेल्या सोमवारी याच सदरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाने स्वबळावर लढण्याचे जवळपास निश्चित केल्याचे लिहिले होते. त्याचा परिणाम ठाकरे शिवसेनेवर इतक्या तडकाफडकी होईल, असे वाटले नाही. नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत, असे म्हणत संजय राऊत यांनी एकदाचे होऊनच जाऊ द्या, असेही सांगून टाकले. त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी अशा बातम्या सुरू झाल्या. मात्र, ही बिघाडी नसून ठरवून घेतला जाणारा काडीमोड असेल. महायुती सत्तेत असली तरी भाजपला मुंबई, ठाण्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आहे. तशीच अवस्था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे.

शिवसेनेत गटप्रमुख हा महत्त्वाचा माणूस असतो. त्याच्या जीवावर मुंबईत शिवसेना आजपर्यंत राज्य करत आली आहे. मुंबईच्या २२७ वाॅर्डमध्ये जवळपास ५५ हजार गटप्रमुख असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. गटप्रमुख त्यानंतर शाखाप्रमुख, त्यानंतर उपविभागप्रमुख आणि शेवटी विभागप्रमुख अशी हायरारकी सेनेत आहे. गटप्रमुख थेट विभागप्रमुखाला रिपोर्टिंग करतो. विभागप्रमुख पक्षप्रमुखाला रिपोर्टिंग करतो. शिवसेनेत फूट पडण्याआधी हे नेटवर्क मजबूतपणे काम करत होते. शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून गेले. मात्र, त्यांच्यासोबत हे नेटवर्क त्यांना नेता आले नाही, असा ठाकरे गटाचा दावा आहे.

गटप्रमुखांचे नेटवर्क किती सक्षमपणे अजूनही आपल्या सोबत आहे, याची तपासणी करण्यासाठीच ठाकरे सेनेने मध्यंतरी वेगवेगळे निरीक्षक मुंबईच्या वेगवेगळ्या भागात पाठवले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई फारसे अस्तित्व नाही. काँग्रेसमध्ये निर्णय घेणारा नेता नाही. असणाऱ्या नेत्यांचे ऐकून काम करणारी यंत्रणा काँग्रेसकडे उरलेली नाही. असे अहवाल पक्षनिरीक्षकांनी ठाकरेंना दिले. ते देत असताना प्रत्येकाने किती गटप्रमुख आपल्या सोबत जोडलेले आहेत, याची आकडेवारी दिली. आजही बऱ्यापैकी गटप्रमुखांचे नेटवर्क आपल्या सोबत आहे, हे ठाकरेंच्या लक्षात आले. प्रत्येक निरीक्षकाने आपण स्वतंत्र लढले पाहिजे, असेही सांगितल्यामुळे ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत असताना असेच वागत आले. राज्यात सरकार या दोघांचे होते. मात्र, गावागावात दोघांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढायचे. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये हे दोन्हीही पक्ष आपला मतदार टिकवून ठेवू शकले होते. विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तिघांनाही आपला मूळ जनाधार सुटू नये, याचीच काळजी घ्यावी लागणार आहे. तो सुटू द्यायचा नसेल तर कार्यकर्त्यांना महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उमेदवाऱ्या द्याव्या लागतील. त्यांना मैदानात उतरवावे लागेल. त्यातून पक्षाच्या चिन्हाचे आणि नावाचे नूतनीकरण होईल, अन्यथा लोक पक्ष आणि चिन्ह दोन्ही विसरून जातील, हे लक्षात आल्याने जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय असावा.

शिंदे यांच्या शिवसेनेला याची जाणीव असल्यामुळे त्यांनी या निवडणुका युती म्हणून लढायला हव्यात, अशी भूमिका ठाण्यात घेतली आहे. ठाण्याचे शिंदे गटाचे खा. नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया “लेकी बोले, सुने लागे” या पद्धतीची आहे. “बहुमत असतानाही काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपद मिळणार म्हणून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे, आता स्वबळाचा नारा देत काँग्रेसवर टीका करत आहेत. ही रंग बदलणारी नवीन जात आहे. आता मुंबई महापालिकेसाठी ते अशीच भूमिका घेत आहेत”, या शब्दात म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी त्यांचा रोख भाजपच्या दिशेने आहे. कारण मुंबई, ठाण्यात भाजपाचे नेते सतत स्वबळाची भाषा करत आहेत. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्ह्यातून एका बाजूला डोंबिवलीतल्या रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष करणे आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचे गणेश नाईक यांना मंत्रिपद देणे, निरंजन डावखरे, संजय केळकर अशा आमदारांनी सतत स्वबळाची भाषा करणे या भाजपच्या खेळी शिंदे गटाला अडचणीत आणण्यासाठीच आहेत, हे लक्षात न येण्याइतके शिंदे कच्चे खेळाडू नाहीत. पण, त्यांचा आता नाईलाज आहे. त्यामुळेच भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेला डोळा मारण्यावरून शिंदेसेनेने वेगळी भूमिका घेतली आहे.

गुजराती आणि उत्तर भारतीय आपल्यासोबत किती येतील, याविषयी ठाकरे गटामध्ये शंका आहे. त्यामुळेच त्यांनी एकटे लढताना काही भागात मुस्लिम तरुणांना उमेदवारी देणे आणि दुसरीकडे मराठी कार्ड काढणे यावरही चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्ष स्वबळावर आपली ताकद आजमावून बघेल. स्वतःच्या कार्यकर्त्याचे नेटवर्क मजबूत करेल. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. आता स्वतःचे घर नीटनेटके करणे, कार्यकर्ते, पदाधिकारी बूथ सांभाळणारी यंत्रणा अशा सगळ्या गोष्टी आपल्या सोबत किती आणि कशा पद्धतीने टिकून आहेत? याचा आढावा घेण्यासाठी या निवडणुकांचा वापर केला जाईल. तेव्हा संजय राऊत यांनी स्वतंत्र लढण्याची भाषा केली म्हणजे काहीतरी जगावेगळे विधान केले असे म्हणून त्यांच्यावर हल्ला चढवणाऱ्यांनी, आपण आघाडीसोबतच लढणार आहोत किंवा आपण महायुतीचाच भाग म्हणून या निवडणुका लढू, असे छातीठोकपणे सांगावे. तरच त्या बोलण्याला अर्थ राहील.

– आपलाच बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *