बुधवार, ४ डिसेंबर २०२४
4 December 2024

पेपर विक्रेता, शाखाप्रमुख, रिक्षा चालक आणि आमदार

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी 

विधानसभेत यावेळी अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील. ईव्हीएमवरून वाद सुरू आहे. त्या वादाचे जे काही राजकारण व्हायचे ते होईल. मुंबईतले ३६ पैकी काही आमदार ‘लोकमत’च्या कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी आले. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यातून त्यांचे आयुष्य उलगडले ते स्तिमित करणारे होते. आपण कधी आमदार होऊ असे स्वप्नही त्यातील अनेकांनी पाहिले नव्हते. प्रत्येकाकडे सांगण्यासाठी स्वतःची अशी वेगळी स्टोरी आहे. ती कष्टाची आहे. मेहनतीची आहे. यातील काही जण अजूनही आपण आपली जमीन विसरलेलो नाही हे सांगणारे भेटले. यातील अनेक जण पाच वर्षांनंतर कसे असतील हे पाच वर्षांनी कळेल.

माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे यांना पराभूत करून आलेले महेश सावंत. घरची अत्यंत बेताची परिस्थिती. वडील बॉम्बे डाइंगमध्ये मिल कामगार. ज्या काळात गिरण्यांमध्ये संप झाला त्यात दत्ता सामंत यांच्यासोबत महेश सावंत यांचेही वडील होते. संप खूप काळ चालला. घर कसे चालवायचे हा प्रश्न होता. त्यावेळी बाइंडिंग, फोल्डिंगचे काम महेश करायचे. त्यांचा भाऊ पेपर वाटायचे काम करायचा. अशा परिस्थितीत महेश पुढे आले. ज्या सदा सरवणकर यांचे पक्के पाठीराखे अशी त्यांची ओळख होती. त्याच सरवणकारांचा पराभव करून महेश सावंत आमदार झाले. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्यांच्यासाठी आपण एका क्षणात आमदारकी सोडून देऊ असेही ते म्हणाले. अनंत ऊर्फ बाळासाहेब नर जोगेश्वरी पूर्वमधून निवडून आले. कधीकाळी मुंबईत ते घरोघरी पेपर टाकायचे. सामाजिक जीवनाची आवड होती. त्यातून शिवसेना जवळची वाटली आणि ते शिवसैनिक झाले. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले.

वर्सोवामधून उद्धव ठाकरे शिवसेनेचे हारून खान विजयी झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी हारून खान यांना राजकारणात आणले. पुढे हारून खान यांच्या पत्नी शायदा यांना उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकपदासाठी उभे केले होते. आपण कधी आमदार होऊ, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. ऑफिसमधून निघाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लोकमत कार्यालयाच्या खाली फुटपाथवर एक महिला घरगुती जेवण घेऊन येते. जेवण खूप चांगले आहे असे सांगितले. त्यांनी भूक लागली असे सांगत तिथेच उभे राहून जेवण केले. हा साधेपणा जेवण देणाऱ्या त्या महिलेच्या कायम लक्षात राहिला.

दिलीप मामा लांडे मुंबईत रिक्षा चालवायचे. त्यांच्या स्वतःच्या दोन रिक्षा होत्या. कोणालाही दवाखान्यासाठी ते रिक्षाने मोफत सोडायचे. १९९७ मध्ये राज ठाकरे यांनी त्यांना पहिल्यांदा नगरसेवक केले. पुढे त्याच राज ठाकरेंच्या मनसेचे सहा नगरसेवक फुटले. त्यात दिलीप लांडे होते हा भाग वेगळा. पहिल्यावेळी ते आमदार झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या चांदीवली मतदारसंघात त्यांना इमारतींच्या दुरुस्तीसाठी सा़डेचार कोटींचा निधी हवा होता. उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून तो द्यायला नकार दिल्याचा राग त्यांच्या मनात होता. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला तेव्हा ते त्यांच्यासोबत गेले. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात जवळपास ८५ कोटी रुपयांचा निधी दिला. इमारतींचे पुनर्वसन जोरात सुरू झाले. मग आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत का राहायचे नाही? असा थेट सवाल त्यांनी केला. आपल्या मतदारसंघात एका मुस्लीम व्यक्तीने आपण निवडून यावे म्हणून ९० दिवस उपवास केला, ते सांगताना त्यांच्या डोळ्यांत पाणी होते.

भाजपचे अतुल भातखळकर तिसऱ्यांदा कांदिवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. एवढी वर्ष माझा मोबाइल नंबर आहे तोच आहे. आलेला प्रत्येक फोन मी स्वतः घेतो. जेव्हा घेणे शक्य नसते तेव्हा कॉल बॅक करतो. माझे ते सगळ्यात मोठे भांडवल आहे, असे भातखळकर यांनी मोकळेपणाने सांगितले. लोकांनी ठरवले म्हणून मी निवडून आलो असे विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी म्हणाले. आपल्याला आपल्याच काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाने विश्वास टाकला. माझी निवडणूक लोकांनीच लढवली असे पराग अळवणी सांगत होते. घरात वडील खासदार. बहीण आमदार. आपण राजकारणात येऊ असे कधी वाटलेही नव्हते. अजूनही आयुर्वेदिक महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकी करावी वाटते, असे सांगणाऱ्या डॉ. ज्योती गायकवाडही भेटल्या.

ही अनेक उदाहरणे सांगण्यामागचे कारण एकच. आज मोकळेपणाने स्वतःच्या यशाची सरळ, साधी, सोपी गोष्ट सांगणारे असे अनेक नेते भेटतील. त्यांच्या कथा सांगतील. मात्र पुढच्या पाच वर्षात ते जेथे कुठे असतील, त्याहीवेळी त्यांनी इतक्याच साधेपणाने त्यांच्या पाच वर्षाच्या यशाची गोष्ट मतदारांना तितक्याच मोकळेपणाने सांगायला हवी. तशी अपेक्षा प्रत्येकाचीच असेल. या व अशा नेत्यांकडून आपण अशी अपेक्षा करू शकतो.

या निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च झाला. ज्या कार्यकर्त्यांना कधी हजार रुपये मौजमजेसाठी मिळायचे, त्यांना लाखो रुपये मिळाले. काही पक्षाच्या काही उमेदवारांना २५ ते ५० कोटी रुपये दिल्याच्या चर्चा रंगल्या. मुंबईतल्याच काही मतदारसंघात प्रत्येक घरात ३५ हजार रुपये दिल्याच्या कहाण्या आल्या. इतका अमाप पैसा वाटून जे आमदार झाले असतील ते पाच वर्षे तुम्हाला विचारतील का? हा प्रश्नही कधी मतदारांना स्पर्श करून गेला नाही. पंधरा लाख तुमच्या खात्यात जमा होतील असे कधीकाळी सांगितले गेले, त्या ठिकाणी १५०० रुपये महिना देऊन तुमचे मत विकत घेतल्याचे मीम्स सोशल मीडियात व्हायरल झाले. ज्यांनी साधेपणाने निवडणूक लढवून यश मिळवले त्या सगळ्यांना त्यांचा साधेपणा टिकून राहावा यासाठी शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *