
मुंबई काँग्रेसच्या हटवादीपणाने रवी राजा भाजपच्या दारी
वर्षा गायकवाड यांना आता सायन कोळीवाडा जिंकावाच लागेल
अतुल कुलकर्णी / मुंबई डायरी
गेली ४४ वर्षे मुंबई काँग्रेसमध्ये काम करणारे मावळत्या महापालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि मुंबई काँग्रेसचा एक प्रभावी चेहरा असणारे रवी राजा अखेर ‘भाजप’च्या दारात गेले. रवी राजा काँग्रेसमध्ये असते तर मुंबईत काँग्रेसच्या सगळ्या जागा जिंकायला मदत झाली असती असेही नाही. पण त्यांनी या काळात पक्ष सोडल्यामुळे सायन कोळीवाड्याची काँग्रेसची जागा पूर्णपणे अडचणीत आली आहे.
कधीकाळी मुंबई काँग्रेसने ३६ च्या ३६ जागा लढवल्या होत्या. तडजोडीच्या राजकारणात कधी ३३ तर कधी २८ करत करत काँग्रेस आता फक्त १० जागा लढवत आहे. लोकसभेला ६ पैकी ५ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी फक्त २ जागा मिळाल्या होत्या. त्यातील एक जागा शिवसेनेच्या पाठबळावर जिंकता आली. अशा स्थितीत मुंबई काँग्रेसने ज्या एक दिलाने काम करणे अपेक्षित आहे ते कुठेही होताना दिसत नाही. त्यामुळेच रवी राजा यांच्यासारख्या निष्ठावान नेत्याला भाजपच्या दारात जावे लागले आहे. मुंबई काँग्रेस आता धारावी काँग्रेस झाली असून ज्येष्ठ, एकनिष्ठ नेत्यांचा अपमान करण्याने पक्षाचे कसे भले होईल? असा सवाल एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. रवी राजा यांची नाराजी दूर करून त्यांना थांबवण्याचे कुठलेही प्रयत्न केले गेले नाहीत गेले. रवी राजा, अमित शेट्टी यांनी आपल्याकडे यावे म्हणून गेले चार दिवस भाजपाचे पडद्याआड प्रयत्न सुरू होते. त्याची भनकही मुंबई काँग्रेसला लागली नाही, यातच सगळे काही आले असेही तो नेता म्हणाला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांनी गणेश यादव यांच्यासाठी हट्टाने सायन कोळीवाड्याची जागा मागून घेतली. आता ती जागा जिंकून रवी राजांचे फार महत्व नाही हे दाखवण्याची जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्यावर आली आहे. सायन कोळीवाड्यातून भाजपचे तमिळ सेल्वन विजयी झाले तर रवी राजा पक्ष सोडून गेल्याचा फटका बसला हे सिद्ध होईल. काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते मुंबई काँग्रेस मधील काही नेत्यांच्या एकाधिकारशाहीमुळे नाराजीतून तमिळ सेल्वन यांच्या पाठीशी गेले तर आश्चर्य नाही, असे असेही काँग्रेसमध्ये बोलले जात आहे.
गणेश यादव सायन कोळीवाड्यातून गेल्यावेळी तीस-पस्तीस हजार मतांनी पराभूत झाले होते. यावेळी येथून रवी राजा किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत जगन्नाथ शेट्टी यांचा मुलगा अमित यांना उमेदवारी द्यावी असे सगळे नेते सांगत होते. मात्र गणेश यादव यांच्यासाठी वर्षा गायकवाड यांनी आग्रह धरला. त्यामुळे पुढचे सगळे रामायण घडले. वर्सोव्याची जागा काँग्रेसला सहज जिंकता येण्यासारखी होती. मात्र ती जागा काँग्रेसने कसलाही हट्ट न घालता सोडून दिली. माजी मंत्री सुरेश शेट्टी या जागेसाठी आग्रही होते. भायखळ्याची जागा ही काँग्रेसने जिंकण्या आधीच घालवली आहे. धारावीची जागा वर्षा गायकवाड यांनी स्वतःच्या बहिणीसाठी म्हणजे ज्योती गायकवाड साठी मिळवली. ती जागा काँग्रेस जिंकेलही, मात्र सायनची जागा केवळ नेत्यांच्या हट्टापायी काँग्रेसने घालवली आहे.
वर्षा गायकवाड, माजी मंत्री असलम शेख आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप या तिघांनी मिळून मुंबईच्या उमेदवारांची नावे निश्चित करावी असे ठरले होते. पण गायकवाड यांनी स्वतःची टीम उभी करण्याच्या नावाखाली वर्सोवा, भायखळा अशा खात्रीने निवडून येणाऱ्या जागा सोडल्या आहेत. उमेदवार निवडताना जेवढा वेळ धारावी आणि सायनच्या उमेदवार निवडीसाठी गेला त्याच्या अर्धा ही वेळ वर्सोवा, भायखळासाठी आमच्या नेत्यांनी घालवला नाही. लोकसभा निवडून आली म्हणजे विधानसभा सहज मिळेल या भ्रमात जागावाटप करणे आम्हाला अंगाशी येऊ शकते अशी प्रतिक्रिया मुंबईतल्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे.
Comments