देवा, आम्ही आता कसेही वागतो, काहीही करतो…!
अतुल कुलकर्णी
बाबूरावांचा फोन वाजला. हातातला पेपर बाजूला करत बाबूरावांनी हॅलो अशी साद दिली. पलीकडून आवाज आला… नमस्कार. मी देवांचा देव इंद्रदेव बोलतोय… कसे आहात बाबूराव…?
क्षणभर काय बोलावे तेच बाबूरांवाना कळेना. साक्षात इंद्रदेवाचा फोन. बाबूराव पुटपुटले… देवा काही चूक झाली का पामराकडून…? थेट फोन केला… मी रोज इमाने इतबारे हात जोडून नमस्कार करतो…
हसत हसत इंद्रदेव म्हणाले, तसं नाही बाबूराव. तुम्ही सगळ्या जगाची खबरबात ठेवता, म्हणून फोन केला. काय चालू आहे तुमच्या पृथ्वीलोकात… हल्ली महाराष्ट्र फारच प्रगत, जास्तीत जास्त सहिष्णू होतोय अशा बातम्या आहेत आमच्याकडे… तुमच्या राज्यात नेमकं काय चालू आहे जाणून घ्यायला फोन केलाय… सांगा आम्हाला काही गोष्टी…
ते ऐकून बाबूरावांचा जीव भांड्यात पडला. देवा, सगळं सांगतो आपल्याला, असं म्हणत बाबूरावांनी माहिती सांगायला सुरुवात केली…
देवा, आम्ही जरा जास्तीच सहिष्णू झालोय हे खरं आहे. महाराष्ट्र सहिष्णू, सुसंस्कृत, दर्जा राखून राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहे; पण त्या परंपरा आता जुन्या झाल्या देवा. काळ बदललाय… आम्ही जुन्या प्रथा-परंपरा मोडीत काढण्याचं ठरवलंय… पूर्वी आमच्यात सहनशक्ती होती. दुसऱ्याने सांगितलेलं आम्ही ऐकायचो… आता तेवढा वेळ नाही राहिला देवा… आणि आम्ही उगाच कोणावरही, कसेही आरोप करू शकतो. ओरडून बोलू शकतो. वाट्टेल ते आक्षेप घेऊ शकतो. समोरच्या व्यक्तीनं प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देणं सोयीचं नसेल तर आम्ही लगेच त्याने उपस्थित केलेला प्रश्न सोडून भलताच विषय काढण्यात तरबेज झालोय… त्यात आमचा कोणीही हात धरू शकणार नाही… समजा देवा, तुम्ही विचारलं की, राज्यातल्या पाणी टंचाईला कोण जबाबदार आहे…? लगेच राज्यातले नेते सांगतील, केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलचे दरच कमी करत नाही. त्यामुळे राज्यात महागाई वाढत चाललीय… यांना लोकांच्या प्रश्नाचं काही घेणं-देणं नाही… आता मला सांगा देवा, पाणीटंचाईचा आणि या उत्तराचा काही संबंध तरी आहे का…? किंवा तुम्ही विचारलं, पेट्रोल, डिझेलच्या किमती केंद्र सरकार कमी का करत नाही? लगेच केंद्रावर प्रेम करणारे राज्यातले नेते उत्तर देतात, देशासाठी त्याग केला पाहिजे… गेल्या ६० वर्षात जे झालं नाही ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांना आम्ही चांगलं जीवनमान देऊ इच्छितो… त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण देण्याची तयारी करतोय… आणि राज्यातले नतदृष्ट सरकार त्यात आडकाठी आणत आहे… आता मला सांगा देवा, या तरी प्रश्नाचा आणि उत्तराचा काही संबंध आहे का?. पण दोन्ही बाजूचे नेते आता या खेळात एकदम पीएच.डी. मिळण्यात तरबेज झाले आहेत.
मागे एकदा राहुल गांधी यांची मुलाखत अशीच गाजली होती. त्यांना प्रश्न काय विचारले आणि त्यांनी उत्तरं काय दिली? म्हणून त्यांची ती मुलाखत खूप गाजली होती. मात्र आता सगळे नेते जवळपास त्याच मुलाखतीला फॉलो करतात. जे विचारलं ते सोडून भलतीच उत्तरं देतात. त्यामुळे मूळ विषय काय आहे, ज्याला प्रश्न विचारला आहे त्याला त्याचं उत्तर येत की नाही, याच्याशी काही घेणं-देणं उरलं नाही देवा…
आणि आमची सहिष्णूवृत्ती एवढी वाढीला लागली आहे की, पूर्वी आम्ही रस्त्यावर मोर्चे काढायचो. आता लोकांच्या घरावर काढतो. पूर्वी सरकारी मालमत्तांचे नुकसान करायचो, आता दगड, चपला घेऊन कोणाच्याही घरावर चालून जातो… कोणी हात जोडून काही सांगितलं तरी आम्ही ऐकत नाही… कारण आम्हाला एकदम वेगळं काहीतरी करायचं आहे. राज्याचा विकास, जनतेच्या अडचणी गेल्या उडत… आम्ही म्हणतो तसंच झालं पाहिजे हे जास्ती महत्त्वाचं आहे देवा हल्ली… तुमच्या दरबारात गेल्यावर तुम्हाला काय उत्तर द्यायचं याचीही आम्हाला आता चिंता वाटेनाशी झालीय देवा…
बाबूराव, अहो काय सांगताय तुम्ही… कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र माझा… फारच प्रगती केली बाबूराव तुम्ही… मला आता तुमची चिंताच उरलेली नाही. देव तुमचं भलं करो असं मी तरी कोणत्या तोंडानं म्हणू बाबूराव… चालू द्या, ठेवतो फोन मी… असं म्हणत इंद्रदेवांनी फोन ठेवला. तेवढ्यात बाबूरावांच्या खिडकीची काच रस्त्यावरून आलेल्या दगडाने खळखट्याक आवाज करत फुटली… बाहेर पाहिले तर हनुमान चालिसा रस्त्यावर वाचायची की नाही यावरून दोन गटात दगडफेकीची स्पर्धा नुकतीच सुरू झाली होती.
Comments