शरद पवार, राज ठाकरेंना जमले ते इतरांना का नाही?
मुक्काम पोस्ट महामुंबई/ अतुल कुलकर्णी
मध्यंतरी मकरंद अनासपुरे यांनी ‘लोकमत’ला भेट दिली. वेगळ्या विषयावर चर्चा सुरू असताना निवडणुकीचा विषय निघाला. तेव्हा त्यांनी सहज प्रश्न केला. कोणत्या उमेदवाराच्या जाहीरनाम्यात स्वतःच्या मतदारसंघात एखादे चांगले नाट्यगृह, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे वेगळे व्यासपीठ किंवा मराठी चित्रपटांसाठीची काही कल्पना आहे का..? अर्थात याचे उत्तर नाही, असेच होते. लोकसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्याच्या दिशेने जात आहेत. अशावेळी एकही उमेदवार साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रासाठी आपल्याला नेमके काय करायचे आहे, याबद्दल एक शब्द बोलताना दिसत नाही. कोणत्याही शहराची सांस्कृतिक भूक भागवण्याचे काम हे क्षेत्र करत असते. माणसं सांस्कृतिकदृष्ट्या सुधारलेली, पुढारलेली असली तर त्यांच्या आजूबाजूचा परिसरही सुधारतो. हे कोणते रॉकेट सायन्स नाही. डान्स बार किंवा बीअरबारच्या बाहेर गुटखा, सिगारेट, तंबाखू, पान, विडी यांचीच दुकाने दिसतात. अशी दुकाने शाळेच्या दोनशे मीटर परिसरात असू नयेत, असाही नियम आहे. शाळेत येणाऱ्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, एवढे साधे कारण त्यामागे आहे. मग आपण ज्या परिसरात राहतो, त्या परिसरात एखादे चांगले नाटक बघायला मिळावे, एखादा चांगला मराठी सिनेमा पाहता यावा किंवा गाण्यांची मैफल, एखादे व्याख्यान असा उपक्रम जर नियमितपणे घडू लागला तर आजूबाजूचे लोकही त्या पद्धतीचा आचार-विचार करू लागतात. हा साधा विचार जिल्ह्याचे, राज्याचे, देशाचे राजकारण करू पाहणाऱ्या नेत्यांना का येत नसावा?
विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे हे नेते आवर्जून नाटकांना, संगीताच्या कार्यक्रमांना जायचे. कवी, साहित्यिकांसोबत गप्पांची मैफल हा विलासराव देशमुख यांच्या आवडीचा विषय असायचा. मनोहर जोशी दिवाळीला दिवाळी अंक भेट पाठवायचे. विनोद तावडे, आशिष शेलार आजही वाढदिवसाची भेट म्हणून पुस्तक विकत घेऊन पाठवतात.
शरद पवार अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना भक्कम पाठिंबा द्यायचे. नाट्य, साहित्य, कलाक्षेत्रातल्या अनेकांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. एकदा त्यांनी सगळ्या साहित्यिकांना एशियाड बसमध्ये बसवून अहमदनगर ते नेवासा असा प्रवास केला होता. अनेक साहित्यिक, विचारवंत त्यांच्याकडे मनमोकळ्या गप्पा मारायला आजही जातात. मध्यंतरी शरद पवार आजारी असताना आशा भोसले त्यांना भेटायला गेल्या. तेव्हा शरद पवारांनी काही जुन्या गाण्यांच्या आठवणी आशाबाईंना सांगितल्या. तेव्हा त्यांनीही शरद पवारांसाठी कुठलीही वाद्यसंगत नसताना सुरेल आवाजात ती गाणी गाऊन दाखवली. हा निखळ आनंद किती राजकारण्यांनी आजपर्यंत घेतला असेल..?
राज ठाकरे हे कायम मराठी, हिंदी कलावंतांच्या संपर्कात असतात. नवीन येणारे सिनेमा, पुस्तक याची त्यांना माहिती असते. त्यांच्याकडे एक कलासक्त दृष्टी आहे. सौंदर्याचे आणि एखादी गोष्ट सादर करण्याचे कोणते व कसे मापदंड असावेत, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. मायकल जॅक्सनच्या बुडापेस्ट येथे झालेल्या एका शोची सीडी पत्रकार मित्रांना बोलावून दाखवणे… ती दाखवत असताना तो कार्यक्रम कशा पद्धतीने कोणी आयोजित केला होता, याची पडद्यामागची स्टोरी सांगणे हे केवळ राज ठाकरेच करू जाणे..! माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची स्वतःची लायब्ररी आवर्जून बघण्यासारखी आहे. वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकांचे त्यांचे वाचन प्रचंड आहे. ते स्वतः उत्तम फोटोग्राफर आहेत. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन प्राण्यांचे फोटो काढणे, हा त्यांचा छंद त्यांनी आजही जोपासला आहे. आशिष शेलार सतत वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेत असतात.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील बारा लोकसभा मतदारसंघांमधून किती उमेदवार अशा पद्धतीचा वेगळा लोकसंग्रह स्वतःजवळ ठेवून आहेत..? किती जणांना नाट्य, साहित्य, कलाक्षेत्रातली जाण आहे? त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना भेटावे, त्यांच्याशी गप्पा माराव्या, असे किती उमेदवारांना वाटते..? या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मतदारसंघात चांगले वातावरण तयार करण्यासाठी काय केले पाहिजे, हे विचारण्यासाठी किती उमेदवारांना लेखक, कलावंत, विचारवंत यांच्याशी चर्चा करावी वाटली..? या गोष्टी केलेला एकही उमेदवार आज तरी सापडणार नाही. हे कटू असले तरी वास्तव आहे.
आपल्याकडे मराठी सिनेमाला चित्रपटगृह मिळत नाही म्हणून आपण कायम ओरड करतो. मात्र नाट्यगृहांमध्येदेखील महिन्याचे तीस दिवस रोज नाटक किंवा गाण्यांचा कार्यक्रम होतोच असेही नाही. अशावेळी या नाट्यगृहांचा उपयोग करून त्या ठिकाणी जर मराठी चित्रपट दाखवण्याची योजना आखली, त्यासाठी नाममात्र तिकीट लावले, तर नाट्यगृह कायम एकमेकांच्या भेटण्याचे ठिकाण बनेल. लोकांना वेगवेगळे चित्रपट पाहता येतील. मराठी सिनेमालाही चांगले दिवस येतील. नाट्यगृहांनादेखील आर्थिक फायदा होईल, हा विचार मकरंद अनासपुरे यांनी मांडला. मात्र एकाही नेत्याला त्यावर गंभीरपणे विचार करावा, असे वाटलेले नाही. प्रायोगिक तत्त्वावरदेखील असा उपक्रम एखाद्या नाट्यगृहासाठी राबवून बघावा, असेही कोणाला वाटलेले नाही.
ही अनास्था आपला नेता आपल्या समाजाकडे कशा पद्धतीने बघतो, हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरवणे, दिवाळीच्या निमित्ताने दिव्यांची आरास करून दिवाळी अंकांचे स्टॉल लावणे, असे उपक्रम राज ठाकरे करू शकतात. डोंबिवलीत पुस्तकांचा रस्ता केला जातो. लोक पुस्तके बघण्यासाठी गर्दी करतात. मग असे उपक्रम आपल्या मतदारसंघात राबवण्यासाठी आपणच निवडून दिलेल्या नेत्यांना जड का जाते..? आपल्याकडे मते मागायला येणाऱ्यांना आपण हे प्रश्न विचारा. मग पहा तुम्हाला काय उत्तरं मिळतात ते…
Comments