शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

शिवसेनेच्या गप्प राहण्याचे वेगळे अर्थ निघू लागले
म्हणून कारवाईवरचा निर्णय झाला..!
शिवसेनेला आक्रमकपणे एकत्र आणण्याचे काम भाजपने केले

अतुल कुलकर्णी / लोकमत
मुंबई : गेले काही दिवस भाजपचे नेते शिवसेनेवर सतत टीकास्त्र सोडत होते. कधी शिवसेना भवन फोडण्याची तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरे तुरेची भाषा सुरू झाली. तरीही शिवसेना काहीच बोलत नव्हती. त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली अशा चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानफडात मारण्यापर्यंत भाषा गेली तेव्हा मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपला शिंगावर घेण्याचा निर्णय घेतला. भाजपने स्वतःच्या राजकीय खेळीने संपूर्ण शिवसेनेला त्वेषाने एकत्र येण्यास भाग पाडले. त्यामुळे आजतरी या राजकीय नाट्यात शिवसेनेची सरशी झाल्याचे चित्र आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा राजकीय गदारोळ, नेमका कोणाच्या पथ्यावर पडेल हे आज सांगणे कठीण असले तरी, आमच्या खेळीमुळे शिवसेना मात्र एकत्र आली हे वास्तव नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. अगदी सुरुवातीला शिवसेना भवनावर भाजपने मोर्चा काढला त्यावेळी शिवसैनिक एकत्र आले, आणि त्यांनी निकराने त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आ. प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. मुंबईसह महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांसाठी शिवसेनाभवन हे मंदिरासारखे आहे. त्यामुळे शिवसेना भवन तोडण्याची भाषा करणे हे प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयाला हात घालून गेले. जोरदार टीका सुरू झाली. त्यावेळी प्रसाद लाड यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. पुढे शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेकडून मनसेने परप्रांतीयांविषयीची केलेली विधाने पुढे केली गेली. जैन आणि गुजराती समाजाविषयी मनसेने केलेल्या आंदोलनांचे फोटो व्हायरल झाले. या सगळ्यांचा भाजपाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत आहे असे दिसू लागले.

दरम्यान, भाजपने शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री केले. राणे यांनी जनसंवाद यात्रा सुरू करताना, शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून यात्रा सुरू करण्याची घोषणा केली. भाजपची यात्रा, शिवसेनाप्रमुख यांना वंदन करून कशासाठी? असा सवाल भाजपच्या काही नेत्यांनी दबक्या आवाजात केला. पण राणे यांच्या आक्रमकपणापुढे कोणाचेही फारसे चालले नाही. त्यामुळे भाजपला यात्रा काढताना सुद्धा शिवसेनेची गरज पडते, अशी टीका शिवसेनेकडून सुरू झाली.

याच काळात राणे यांनी कोकणातल्या पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. तरीही शिवसेनेकडून कोणीही काहीच प्रतिउत्तर दिले नव्हते. यात्रे दरम्यान राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची, शिवसेनेत घुसमट होत आहे. ते रबर स्टॅम्प आहेत अशा पद्धतीची टीका केली. चोहोबाजूंनी शिवसेनेवर असे हल्ले होऊ लागले तरीही शिवसेना गप्प होती. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, अशी टीका शिवसेनेवर सुरू झाली. सत्तेत असताना आपणच गोंधळ घालायचा आणि राडेबाजी करायची, हे योग्य होणार नाही. म्हणून आपण गप्प आहोत असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सांगत होते. मात्र जास्त गप्प राहिलो तर डोक्यावरून पाणी जाईल, असा मतप्रवाह पक्षात वाढीला लागत असतानाच राणे यांच्या ‘त्या’ विधानाने कळस चढवण्याचे काम केले. आता जर आपण राणेँविरुद्ध किंवा भाजप विरुद्ध पावले उचलली नाहीत तर शिवसेना पूर्णपणे हतबल झाल्याचा संदेश जाईल, अशी चर्चा शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्या घटनाक्रमावर गप्प होते. मात्र आता राणे आणि भाजप नेते थेट घरात घुसण्याची भाषा करत अंगावरच येत आहेत, हे पाहून राणे यांना धडा शिकवण्याचे ठरले. त्यातून त्यांच्या विधानाचा कायदेशीर अभ्यास केला गेला आणि पुढची सूत्रे वेगाने हलली. राणे यांच्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही, असे म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राणे यांच्या विधानापासून भाजपला वेगळे करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या या भूमिकेनंतर मूळ भाजपचे नेते ऍड. अशिष शेलार वगळता एकही ज्येष्ठ नेता राणे यांच्या मदतीला धावल्याचे चित्र दिसले नाही. दरम्यान, नारायण राणे यांच्या अटकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनीही सरकारच्या कृतीचे समर्थन केले आणि भाजपवर खरपूस टीका केली.


शिवसेनेच्या जवळ जाण्याचे प्रयत्न राणे यांनी हाणून पाडले
जे झाले ते झाले आपण पुन्हा एकत्र येऊ, असे म्हणत भाजपचे काही नेते गेल्याच आठवड्यात उद्धव ठाकरे यांना भेटले होते. आपण एकत्र पुन्हा सरकार बनवू, असा प्रस्ताव त्यांना देण्यात आला. त्यावेळी ठाकरे यांनी त्याला सहमती दर्शवली होती. मुख्यमंत्रीपद एक वर्ष ते सहा महिने शिवसेनेकडे राहील. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या दोघांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे. नंतर मुख्यमंत्रीपद भाजपने स्वतःकडे घ्यावे. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागांचे वाटपही आताच ठरवून घ्यावे. त्या बैठकीतच नारायण राणे देखील आपली भूमिका बदलतील, आणि शिवसेनेबद्दल चांगली विधाने करतील, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. मात्र त्यावर उद्धव ठाकरे यांनी काडीचाही विश्वास दाखवला नाही. तेव्हा तो विषय तेथेच थांबवण्यात आला. मात्र आता आमच्या या सगळ्या प्रयत्नांवर राणे यांच्या विधानाने पाणी पडले असेही भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.

आजच्या राजकीय डावाचा फायदा कुणाला..?
नारायण राणे यांची अटक आणि राज्यभर भाजप शिवसेनेमध्ये जुंपलेली लढाई याचा फायदा नेमका कोणाला होणार? याची राजकीय चर्चा सुरू झाली. मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची राडेबाजी झाली. सत्ता असूनही शिवसेनेत अस्वस्थता होती. मंत्री जुमानत नाहीत, कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशा भावना वाढीस लागल्या होत्या. त्याच वेळी हा सगळा प्रकार घडल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर एकत्र आले. याचा फायदा शिवसेनेलाच होईल, असे सांगितले जात आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ भाजपचे अनेक नेते कसे काहीही बोलायला तयार नाहीत, याचे दाखले दिले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *