ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का?
अधून मधून / अतुल कुलकर्णी
४१४० उमेदवारांनो आणि त्यांच्या प्रचाराकांनो
नमस्कार
आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे हे आपल्याला माहिती असेलच. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणाऱ्या आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेतील उपमा, उपहास, अलंकार या शब्दांसाठी स्वतःचे प्राण संकटात टाकून अलौकिक कार्य सुरू केले आहे त्यांचे विशेष कौतुक. आत्तापर्यंत जेवढा प्रचार झाला त्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते सदाभाऊ खोत अग्रेसर आहेत. पूर्वी भाजपच्या काही नेत्यांनी शहराचे रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे करू असे सांगितले होते… आमचे सदाभाऊ ग्रामीण नेते आहेत. त्यांनी थेट शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा का? असा सवाल केला आहे. इतकी चांगली उपमा देणाऱ्या सदाभाऊंवर सर्वपक्षीय नेते उगाचच टीका करू लागले, हे योग्य नव्हे…
उद्धव सेनेचे सकाळी ९ ते १० या वेळात राज्यभर प्रसारित होणारे संजय राऊत यांच्या भाषेला तर धुमारे फुटले आहेत. शरद पवार यांच्या विषयी कोणी काही बोलेल आणि त्याला संजय राऊत उत्तर देणार नाहीत असे कसे होईल? तो तर त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आरोप प्रत्यारोपासाठी त्यांच्यासह सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार प्राणी असणाऱ्या कुत्र्याची निवड केली. ज्यांनी ज्यांनी उपमा अलंकारासाठी कुत्र्याची निवड केली त्या सगळ्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तितकी कमीच..! त्यामुळे समस्त श्वान जातीला आपण काहीतरी महत्त्वाचे प्राणी झाल्याचा आनंद झाला आहे. श्वानप्रेम दाखवणाऱ्या सगळ्यांचे समस्त श्वानांनी जोर जोरात भुंकून स्वागत केले आहे.
उद्धव सेनेचे खा. अरविंद सावंत, खा. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचे तर कौतुक करावे तेवढे कमीच आहे. विरोधी पक्षातील महिला उमेदवारांना कोणती उपमा द्यावी याचे खरे तर या दोघांनी क्लासेस सुरू केले पाहिजे. उपहास, विरूक्तीचा वापर कुठे आणि कसा करायचा याचे धडे या दोघांनीच दिले पाहिजेत.
आपल्या विधानसभेला फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी विधानसभेची केलेली व्याख्या आणि विधानसभेत कसे बोलावे याविषयी जे काही सांगितले आहे, तो इतिहास बदलण्याची वेळ आली आहे. त्याची जबाबदारी देखील यावेळी निवडून येणाऱ्या आणि सतत वाट्टेल ती विधाने करणाऱ्या विजयी वीरांकडे दिली पाहिजे. बाळासाहेब भारदे जुन्या जमान्याचे होते. त्यांनी विधानसभेला लोकशाहीचे महा मंदिर अशी उपमा दिली होती. मात्र ती उपमा ही आता बदलण्याची वेळ आली आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर हे महत्त्वाचे काम तुमच्या कृतीतूनच कराल याविषयी आमच्या मनात शंका नाही… बाळासाहेब भारदे यांनी –
तोल सांभाळून बोल कसा लावावा,
वैर सोडून वार कसा करावा,
नर्म होऊन वर्म कसे भेदावे,
दुजाभाव असून बंधुभाव कसा ठेवावा,
अल्पमताने बहुमताला व
बहुमताने लोकमताला
कसा साद-प्रतिसाद द्यावा
आणि ही सर्व संधाने बांधण्यात
लोकसेवेचे अनुसंधान कसे सुटू नये
या सर्व गोष्टींचे दक्षतापूर्वक परिपालन
म्हणजे वैधानिक कार्य..!
विधानसभा म्हणजे शिळोप्याच्या गप्पांचे
ठिकाण नसून नवमहाभारताचे
व्यासपीठ आहे. या जाणिवेने लोकप्रतिनिधी
काम करतील याच अपेक्षेने
लोक त्यांना नियुक्त करीत असतात…
असे काहीसे सांगितले होते. हे त्या काळात योग्य असेलही. पण आता या गोष्टी चालणार नाहीत. त्यामुळे यात बदल करण्याची गरज आहे. तुम्ही सगळे सुज्ञ आहात. यात काय बदल करावे लागतील याची झलक तुम्ही दाखवत आहातच. मराठी भाषेला अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा तुमच्या वेगवेगळ्या उपमा अलंकारांनी आणखी समृद्ध करा. शेलक्या शब्दात समोरच्या नेत्याला कसे शब्दबंबाळ करायचे याचा आदर्श वस्तूपाठ तुम्ही घालून द्याल, यावर आमचा ठाम विश्वास आहे…
जाता जाता एकच : आपल्याकडे एक पद्धत आहे. घरी गेल्यानंतर दिवसभर बाहेर आपण काय काय केले याचा वृत्तांत आपण आपल्या आईला, वडिलांना, पत्नी, मुलांना सांगत असतो. ते देखील त्यांनी दिवसभर काय केले हे आपल्याला सांगतात. यातून घरात एक निकोप संवाद तयार होतो. आपण दिवसभर प्रचार करताना विरोधकांना जी विशेषणे लावली, ज्या शब्दात त्यांचा उद्धार केला, त्याच भाषेत दिवसभराचा वृत्तांत आपण आपल्या घरच्यांना सांगा… त्यांना तुमचा अभिमान वाटेल. असे गौरवी पुत्र आपल्या घरात आहेत याचा त्यांना अभिमान वाटेल. आपली शब्द प्रतिभा दिवसेंदिवस अशीच फुलत जावो आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची ख्याती जगभर नेण्याचे आपले स्वप्न पुरे होवो ही सदिच्छा…
तुमचाच बाबुराव
Comments