शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

मास्तरांनो, ही कामे करावीच लागतील..!

 

अतुल कुलकर्णी

शिक्षकांनी कोणती अशैक्षणिक कामे केली पाहिजेत, याची यादीच ग्रामस्वच्छतेच्या कामासह सरकारने शासन आदेश काढून जारी केली आहे. पिढी घडवण्याचे काम शिक्षकांनी करायचे की अशैक्षणिक कामात स्वतःला झोकून द्यायचे, याचा निर्णय सरकारने घेऊन टाकला आहे. शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करण्यासाठी हा आदेश काढल्याचेही सरकारने म्हटले आहे. बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने २३ ऑगस्टला हा आदेश काढला आहे.

अशा शिक्षकांनी आमच्यासाठी चांगले विद्यार्थी घडवले पाहिजेत, एकविसाव्या शतकातला भारत घडवताना विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित विद्यार्थी घडवण्याचे कामही शिक्षकांनीच केले पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणाऱ्या सरकारने शिक्षकांच्या गळ्यात कामांचे हे जोखड बांधले आहे. त्यांच्या पायात मणामणाच्या बेड्या अडकवून त्यांना धावण्याच्या शर्यतीत सहभागी व्हायला सांगितले जात आहे, हे अत्यंत चीड आणणारे आहे. विद्यार्थी घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांनाच सरकारच्या जाचाला सामोरे जावे लागत असेल तर, त्यांनी दाद कोणाकडे मागायची?

प्रत्यक्ष शिक्षणाची कामे म्हणून जी कामे करायची आहेत त्यांची यादी भलीमोठी आहे. त्यात शैक्षणिक कामांच्या नावाखाली दाखवलेली कामे थक्क करणारी आहेत. त्यात, शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेऊन नजीकच्या शाळेत त्यांची नावनोंदणी करण्याची निश्चिती करणे, नवसाक्षरांचे सर्वेक्षण करणे, विविध योजनांसाठी अत्यावश्यक माहिती शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नसेल तर ती ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीने मागवणे, ती माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे, शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या विविध प्रकारच्या योजनांची शाळास्तरावर अंमलबजावणी करणे, गैरहजर मुलांच्या पालकांसोबत भेटी घेऊन त्यांचे उद्बोधन करणे, शाळा सुधार योजनेअंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत येणारी कामे करत करत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कामही शिक्षकांनी करावे अशी सरकारची अपेक्षा शिक्षकांची छळवणूक करणारी आहे.

ही अशैक्षणिक कामे शिक्षकांनी केली पाहिजेत –

गावात स्वच्छता अभियान राबवणे, प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूकविषयक नियमित चालणारी कामे करणे, हागणदारीमुक्त गाव अभियान राबवणे, इतर विभागांच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी पुन्हा पुन्हा नोंदणी करणे, गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे, इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे, शासन किंवा शासनाच्या संस्था ज्यात शिक्षण आयुक्तालय, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्यबाह्य संस्था यांच्याशी झालेल्या सामंजस्य कराराशिवाय इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे आणि सहभागी करून घेणे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण, पशू सर्वेक्षण, शौचालय सर्वेक्षण अशा विविध सर्वेक्षणाची कामे करणे, शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे, जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती ऑफलाइन पद्धतीने दुबार मागवणे, अनावश्यक प्रशिक्षणे, कार्यशाळा, उपक्रम, अभियान, मेळावे आदी शासनाच्या मान्यतेशिवाय राबवले जाणे, शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑनड्यूटी सहभाग घेणे आणि शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे करणे..!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *