रविवार, २४ नोव्हेंबर २०२४
24 November 2024

लोकसभेच्या आधी काहीच नाही
नंतर मात्र होणार बरेच काही..!

अधून मधून / अतुल कुलकर्णी 

 

प्रिय बापू,
दोन ऑक्टोबर १८६९. आपला जन्मदिवस. आपल्या जन्माच्या दीडशे वर्षानंतरही आपला विचार जगभरात कायम आहे. “गांधी कभी मरते नही..” हे वाक्य हिंदी सिनेमातल्या डायलॉग सारखे वाटेल. मात्र हे कालातीत सत्य आहे. इतक्या वर्षानंतरही आपला अहिंसेचा मंत्र आणि सत्याचे प्रयोग याला तोड नाही. आम्ही देखील आमच्या परीने आयुष्याचा मंत्र जपत आलो आहोत. आम्ही कोणाला थेट मारत नाही, मात्र पाहुण्याच्या काठीने साप मारावा या वृत्तीने आम्ही सतत कार्यरत असतो. सत्याचे प्रयोगही आम्ही आमच्या सोयीने करत आहोत. कधी ते चुकतात. कधी बरोबर ठरतात, मात्र सत्याचे प्रयोग करणे आम्ही थांबवलेले नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहा ना. आम्ही कितीतरी वेगवेगळे प्रयोग विद्यमान विधानसभेत केले आहेत. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या वृत्तीने आम्ही काम करत आहोत. २०१९ ला जी विधानसभा अस्तित्वात आली ती देशाच्या इतिहासात कायम नोंद घेतली जाईल अशी आहे. या विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक हा भेद आम्ही मिटवून टाकला आहे. जे विरोधक ते सत्ताधारी… जे सत्ताधारी ते विरोधक… या विधानसभेने सर्व पक्षांना सत्ताधारी बनवले आणि विरोधकही बनवले. एकाच टर्ममध्ये अशी संधी देशातल्या कुठल्याही विधानसभेने त्यांच्या सदस्यांना दिली नसेल. सगळ्यांची सगळी पदं भोगून झाल्यानंतर आता आम्ही एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल करून नवा आदर्श घातला आहे. लोकशाहीचा समूळ फायदा घेण्याचे काम आमच्या एवढे कोणीच केले नसेल.

आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या विरोधात अपात्रतेच्या इतक्या याचिका केल्या आहेत की पुढच्या दोन पाच विधानसभा आल्या तरी त्याच्यावरील सुनावण्यात पूर्ण होणार नाही.
बापू, तुमचा विश्वास बसत नसेल तर हे वाचाच –

एकनाथ शिंदे गटाने ठाकरे गटातील सुनील प्रभु, सुनील राऊत, वैभव नाईक, रवींद्र वायकर, संजय पोतनीस, केलास पाटील, भास्कर जाधव, प्रकाश फातर्पेकर, राजन साळवी, रमेश कोरगावकर, नितीन देशमुख, राहुल पाटील, उदय सिंह राजपूत यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. ठाकरे गटाने देखील जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या एकनाथ शिंदे, अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, लता सोनावणे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत.

विधानसभेत हे सुरू असताना विधानपरिषद मागे कसे राहणार बापू..? तिकडे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या आ. सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, अनिकेत तटकरे यांच्याविरोधात विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे याचिका दाखल केल्या. तर जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. तर अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाच्या एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांच्याविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.

एवढ्यावरच थांबले असेल असे वाटून घेऊ नका बापू… अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांनी शरद पवार गटाच्या जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, राजेश टोपे, बालासाहेब पाटील, रोहित पवार, संदीप भुसारा, संदीप क्षीरसागर, सुमन पाटील, प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात याचिका दाखल केल्या आहेत.

बापू, जे लोक शरद पवारांना सोडून आपलीच राष्ट्रवादी खरी असे म्हणत भाजपसोबत सत्तेत सहभागी होत मंत्री झाले त्यांना कोणी माफ केले असेल असे आपल्याला वाटत असेल तर तो आपला गैरसमज आहे. बापू शरद पवार गटाच्या जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या अजित पवार धनंजय मुंडे, दिलीप वळसे, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, धर्मराव आत्रम या मंत्र्यांविरुद्ध अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत.
सत्याचे प्रयोग यापेक्षा वेगळे काय असतात बापू..? ज्यांनी विद्यमान मंत्र्यांच्या विरुद्ध अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत, त्यांची त्या मंत्र्यांकडे जेव्हा कामे पडतात, तेव्हा ते विनासंकोच त्या मंत्र्यांकडे कामं घेऊन जातात. मंत्री देखील त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. यापेक्षा पारदर्शकता आणखी काय पाहिजे बापू..?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे किती काळ चालेल..? सुनावण्या, तारखा, निकाल या गोष्टीत अनेक वर्ष जातील. असा विचारही तुमच्या मनात आला असेल. मात्र बापू असे काही होणार नाही. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत हे सगळं चालू राहील. त्यानंतर मात्र बरेच काही होईल… पुन्हा एकदा सत्ताधारी विरोधक होतील… विरोधक सत्ताधारी होतील… सत्ताधारी आणि विरोधक एकत्रितपणे सत्ताधारी होतील… तर काही विरोधक आणि सत्ताधारी एकत्रितपणे विरोधक होतील… आपल्या विचारांवर निस्सीम विश्वास ठेवून आमचे सत्याचे प्रयोग असेच चालू राहतील… बापू, उद्या आपला हॅपी बर्थडे आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
आपलाच
बाबूराव

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *