तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण,
वेडात प्रचारी वीर दौडले सात…
अधून मधून / अतुल कुलकर्णी
प्रचारासाठी धावपळ करणाऱ्या सात वीरांनो,
नमस्कार.
आपण सगळे प्रचारात व्यस्त आहात. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस. शेवटी शेवटी माणूस खूप वेगाने धावायचा प्रयत्न करतो. अशावेळी पायात पाय अडकून पडण्याची भीती असते; पण प्रचार करताना या गोष्टी होणारच. काळजी करू नका. तुम्हाला काहीजण बशीर बद्र यांचा हा शेर नक्की ऐकवतील…
दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों…
अशा शेरोशायरीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपल्याला आता जम कर लढाई करायची आहे. युद्ध जिंकायचे आहे. आपल्या विरोधकांना चारीमुंड्या चीत करायचे आहे. एकदा का समोरच्याचा पराभव झाला, की मग तो स्वतःहूनच शर्मिंदा होऊन आपल्याकडे दोस्तीसाठी येईल. बशीर बद्र जुन्या जमान्याचे शायर होते. आपण नव्या जमान्याचे आहोत. त्यामुळे हा शेरच बदलला पाहिजे…
दुश्मनी जम कर करो,
कोई गुंजाइश न छोडो,
जब कभी वो सामने आये,
गर्दन झुका के आये…
अशा पद्धतीने आपण बशीरजींच्या शेरची नव्या जमान्यासोबत जी ओळख करून दिली आहे, त्याचे आम्हाला फार कौतुक आहे. शेवटी आपल्या कृतीतून आणि बोलण्यातून आपल्यालाच इतिहास घडवायचा आहे. त्यामुळे तुम्ही जे करत आहात ते असेच चालू ठेवा. पुढच्या जमान्यात आपल्यावरच अशा पद्धतीची शेरोशायरी झाली पाहिजे हे लक्षात असू द्या.
यंदाच्या निवडणुकीत प्रचार करताना तुम्ही सगळ्यांनी कसे बोलावे, किती बोलावे, कुठे बोलावे याचे वस्तुपाठ घालून दिले आहेत. येणारी पिढी त्यासाठी कायम तुमचा उल्लेख करत राहील… मागच्या आठवड्यातच, आपण बाहेर जसे बोलता, तसेच घरी बोला… असा सल्ला आम्ही दिला होता. मात्र त्यावर चार चांद चढवण्याचे काम भाजपाचे पाशा पटेल यांनी केले आहे. ज्या पद्धतीची भाषा आणि हातवारे करत त्यांनी सभेत भाषण केले, तो या निवडणुकीचा परमोच्च क्षण होता असे म्हणायला हरकत नाही. या निवडणुकीचे आपण सगळे हिरो आहात. वसंत देशमुख, सदाभाऊ खोत, नितेश राणे, संजय राऊत, सुनील राऊत, अरविंद सावंत अशा सगळ्या जबरदस्त बोलणाऱ्यांचे सरदार पाशा पटेल ठरले. या सात जणांचे त्यासाठी विशेष अभिनंदन. खऱ्या अर्थाने हे सात वीर वेडात दौडले. ते जे काही बोलले, ज्या पद्धतीचे हातवारे त्यांनी केले त्यासाठी आमची लेखणी अतिशय छोटी ठरेल. इतके महान कर्तृत्व त्यांनी या निवडणुकीत दाखवून दिले. ज्यांना कोणाला असेच हातवारे करत कसे बोलावे हे शिकायचे असेल तर त्यांनी निवडणुकीनंतर त्यांच्याकडे क्लासेस लावायला हरकत नाही… पाशा पटेल बांबू लागवडीच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्याची दखल कार्पोरेट क्षेत्राने घेतली आहे; पण ते अशा प्रकारचे बांबू लावतात हे पहिल्यांदा महाराष्ट्राला दिसले असेल… त्यासाठी ते अभिनंदनास आणि विशेष पुरस्कारासाठी अत्यंत योग्य आहेत. कार्पोरेट क्षेत्रही आता त्यांच्या हातवाऱ्यांनी प्रभावित होऊन गेले असेल…
प्रियंका गांधी यांनी शिर्डीत भाषण करताना,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा
अशी ओळ ऐकवली. ह्या अशा ओळी ऐकवण्यापेक्षा आणि लोकांनी अशी भाषणे ऐकण्यापेक्षा तुम्ही लोकांनी भाषणाचा जो ट्रेंड सेट करून दिला आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे असे तुम्हाला वाटत नाही का..? सोयाबीन, कापसाला भाव मिळाला पाहिजे, बेरोजगारी, महागाई यापेक्षा तुम्ही लोकांनी जी भाषणे केली आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत. हे सिद्ध करणारा एक शोधनिबंध तुमच्यातल्याच काही लोकांनी लिहिला पाहिजे. संजय राऊत यांच्याकडून या शोधनिबंधावर प्रस्तावना लिहून घेतली पाहिजे. म्हणजे येणाऱ्या पिढीला तुमच्या भाषणांवर अभ्यास करून स्वतःची भाषणे तयार करता येतील. कुसुमाग्रजांची एक कविता होती. ती सुद्धा काळानुरूप बदलली पाहिजे. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आम्हाला बदल असलेली कविता अशी सुचली आहे –
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण
वेडात प्रचारी वीर दौडले सात…
ते वदता शब्दही थोडे, किंचित तिखे
सरदार पहा सरसावुनि उठले सारे
भाषणात टाकुनी बाण, फेकले सारे
उसळले वादाचे मेघ लाख निमिषात
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
कार्यकर्ते उसळले लाख तीव्र इमानी
सर्वत्र चमकले सात जीव ते मानी,
खग सात झळकले अभिमानी पक्षात
सभांमधून दिसतील अजूनि बाण शब्दांचे
सर्वत्र तरंगे अजूनि स्वर शब्दांचे
क्षितिजावर उठतो अजूनि स्वर शब्दांचा
अशाच सभांची सर्वत्र मागणी होता
वेडात प्रचारी वीर दौडले सात
तेव्हा ही कविता आपण सगळ्यांना पाठवू… आपल्या कौतुकाची कवनं येणाऱ्या काळात लिहू, म्हणजे भावी पिढी आपल्याला कायम लक्षात ठेवेल..! या निवडणुकीत आपण मिळवलेली ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
– आपलाच बाबुराव
Comments