गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४
21 November 2024

तिचे आयुष्य जणू
एका सिनेमाची कथा..!
प्रेरणादायी दीपालीची शब्द कथा

– अतुल कुलकर्णी

(आज दसरा. नवरात्रीचा शेवटचा दिवस. गेले आठ दिवस माझ्या आयुष्यात आलेल्या महिलांविषयी चालवलेल्या मालिकेचा समारोप. त्यासाठी यापेक्षा चांगली दुसरी कथा असूच शकत नाही. या मालिकेत मी माझ्या पत्नी, मुलगी, मैत्रिणी अशा अनेकांवर लिहिले. आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!)

तिचं चौकोनी कुटुंब. आई वडील, भाऊ, बहिण. वडील बँक ऑफ बडोदा मध्ये ऑफीसर. भाऊ पाच वर्षाने लहान. सगळं बालपण खूप आनंदात गेलं. जे मागेल ते मिळत होतं. चित्रकलेची आवड तशी लहानपणापासून. जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये जाऊन शिकण्याची इच्छा. पण इंटरमिडीएट आणि इलिमेंट्री या परिक्षा शालेय वयात देता न आल्याने तेथे जाण्याचा मार्ग हुकला. मात्र पुढे जाऊन पेन्टींगची आवड, पॅशन तिचे प्रोफेशन बनले आणि तिने थेट मुंबईच्या प्रख्यात जहांगिर कला दालनात स्वत:च्या पेंटींग्जचे प्रदर्शन भरवले. तिने एक सरस्वतीचे पेंटीग काढले आणि ते थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या घरात लागले. एक विलक्षण आणि सिनेमाची कथा पहावी अशी तिची स्टोरी… तिचे नाव दिपाली गुप्ते वैद्य.

दिपालीला पेन्टींगची लहानपणी असलेली आवड पुढे आयुष्यात किती व कशी कामी येणार हे जर तिला कोणी त्या वयात सांगितले असते तर तिने ते चेष्टेवर नेले असते. तिने दहावी, बारावी नंतर आर्टस् घेतले. ते घेताना फिलॉसॉफीमध्ये ग्रॅज्यूएशन करण्याचा निर्णय तिने घेतला. पुढे तिला वर्ल्ड नेटवर्क सर्व्हिसेस या एअरलाईनशी संबंधीत कंपनीत नोकरी मिळाली. तेथे कधी दिवसा जॉब असायचा तर कधी नाईटशिफ्ट असायची. यातून कोणत्याही मध्यमवर्गीय घरात जे होते तेच दिपालीच्या घरी झाले. वर्ष दीडवर्षातच तिने तो जॉब सोडला. नंतर तिचे अरेंज मॅरेजही झाले. तीन वर्षांनी त्यांच्या आयुष्यात सानिका आली. पण दोन वर्षांनी कळाले की सानिका ‘स्पेशल चाईल्ड’ आहे. त्यातच संसारात कुरबुरी वाढल्या आणि त्यावेळी पाठचा लहान भाऊ मोठ्या भावासारखा धावून आला. त्यानेच वडिलांना आग्रह करुन दिपाली आणि तिच्या मुलीला आई वडीलांकडे आणले ते कायमचे. त्या सगळ्या काळाबद्दल आता दिपालीला बोलण्याची फारशी इच्छा ही नसते…

मात्र त्या काळात तिचे आई बाबा, भाऊ आणि भावाची बायको सगळे भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे राहीले. आई वडिलांचे दोन बेडरुमचे घर. त्यात भावाचे लग्न झालेले, तरीही त्यांचे मन एवढे मोठे की त्यांनी दिपाली आणि तिच्या मुलीला आपल्या घरात आणि मनात हक्काची जागा दिली. पुढे भाऊ आणि भावजय नोकरीच्या निमित्ताने कॅनडामध्ये गेले. या काळात दिपाली मनाने तशी कोलमडलेली, पण स्वत:च्या मुलीकडे पाहून ती ज्या जिद्दीने उभी राहीली त्याला तोड नाही. घरात स्पेशल चाईल्ड असल्याने त्याला तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. सतत अशा मुलांशी बोलावे लागते. संवाद हे त्यांच्यासाठीचे खरे औषध. आपली मनोवस्था बाजूला सारुन दिपाली मुलीसाठी उभी राहीली.

लहानपणी सानिका उत्तम पोहते हे दिलापीच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने सानिकाला पोहण्याच्या क्लासला पाठवणे सुरु केले. यासाठी तिला पंकज राठोड सरांनी खूप मदत केली. त्यांनी तिला पोहणे शिकवायला सुरुवात केली. स्पेशल मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत सानिकाने मजल मारली. त्यात तिला सिल्व्हर, गोल्ड मेडल मिळू लागले… आणि सानिकाची झेप केवळ स्विमींग पूलपुरती मर्यादित राहीली नाही. तिने थेट समुद्रातल्या पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात आतमध्ये एक किलो मिटरची स्पर्धा होती. सानिकाने समुद्रात उडी घेतली ती आई कडे एकदाही मागे वळून न पहाता… एवढी वर्षे मुलीमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास असा कामी आला होता… आणि सानिकाने त्या स्पर्धेतही मेडल मिळवले…!

मला माझ्या मुलीने समुद्रात पोहण्याची कधीच भीती वाटली नाही. मी माझ्या निर्णयांच्या बाबतीत घाबरेन कदाचित पण मुलीने आत्मविश्वासाने पुढे गेलेच पाहिजे असे मला सतत वाटायचे… हे सांगताना दिपालीचा आत्मविश्वास तुम्हा आम्हाला स्वत:कडे पाहण्याची वेगळीच दृष्टी देऊन जातो…

या संपूर्ण प्रवासात दिपालीने गेली १५ वर्षे टीसीएस कंपनीत नोकरी सुरु ठेवली आहे हे विशेष. पण मनातले विचार, मोडलेला संसार, स्पेशल चाईल्ड असणारी मुलगी… या सगळ्या गोष्टी तिला या काळात प्रचंड अस्वस्थ करायच्या. दिपाली तशी अबोल. स्वत:विषयी कोणाशीही फार न बोलणारी… या अशा अवस्थेत आणि काळात तिची पेंटीग्जची आवड मदतीला आली. मायलेकीमधल्या संवादाला तिने कॅनव्हॉसवर उतरवले. १५ पेंटीग्जची मालिका तिने चितारली. जणू त्या दोघींची ती आत्मकथाच..! त्याचे प्रदर्शन जहांगिरमध्ये भरले होते तेव्हा ते पहायला मी गेलो होतो. ती माझी आणि दिपालीची पहिली भेट. ती सगळी चित्र तुमच्याशी बोलत होती. सानिकाला तिच्या आईने कसं मोठं केलं, कसं वाढवलं याची गोष्ट तुम्हाला सांगत होती… फक्त रंग… वेगवेगळे… मात्र कथा एकच… अस्वस्थ मनाची… आईने मुलीवर केलेल्या प्रेमाची… इतरांनी वागलेल्या वाईटपणाची… मदतीला धावून आलेल्या आई वडील, भावाची… ती सगळी मालिका पाहून त्यावेळी मी एक लेखही लिहीला होता. पण तो अपूर्ण होता. आज तो पूर्ण झाल्याचं समाधान मला आहे…

७३ वर्षाचे कॅन्सरमधून बरे झालेले वडील, ६६ वर्षांची पाठीशी उभी असलेली, सतत काळजी करणारी आई आणि अशा आईची ‘स्पेशल चाईल्ड’ असलेली नात… या सगळ्यांना घेऊन दिपाली आज खंबीरपणे उभी आहे. तिचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे… आज नवरात्री सांगता. नवमी आणि दशमी एकाच दिवशी आलेली. आज दशमीच्या दिवशी देवीच्या आरतीत काय म्हणतो आपण माहिती आहे का तुम्हाला…?

दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ।
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ।। १० ।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।

दिपालीची कथा वाचल्यावर यापेक्षा आजची वेगळी आरती ती कोणती…?
दिपाली, खूप खूप शुभेच्छा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *