तिचं धाडस…! आणि तिचा
माझ्यावर प्रभाव..!!
– अतुल कुलकर्णी
आज पासून नवरात्र सुरु होत आहे. नवरसासाठी आपण देवीची पुजा करतो, पण आपल्या आजूबाजूला आपली आई, बहिण, पत्नी, मुलगी, मैत्रिण अशा अनेकांमध्ये या नवरसाचे अनेक गूण आपण पहात असतो. आजच्या नवरात्रीच्या निमित्ताने माझ्यावर प्रभाव टाकणार्या माझ्या पत्नीविषयी…!
एकटी महिला, कोणतेही प्लॅनिंग नाही… हॉटेलचे अॅडव्हान्स बुकींग नाही… एका देशातून दुसऱ्या देशात जातानाचं तिकीट किंवा कसलं बुकिंगही हातात नाही, कोणीही ओळखीचं सोबत नाही, तरीही तेरा देश, तीन महिन्यात ती एकटी फिरुन आली..! तीथं जाऊन स्वत:च स्वत:चं भाड्याचं घर शोधलं, तीथं मिळणारे पदार्थ आणून स्वत: बनवून खाल्लं. (तिचा स्वयपाक त्या अर्थानं तिथेही सुटला नाहीच) आधी गंमत वाटणारा हा तिचा प्रवास माझ्यासाठी पुढे पुढे भितीचं आणि काळजीचे कारण ठरु लागला. तिच्याशी बोलताना मी तिला ते दाखवत नव्हतो. पण मनात काळजी वाटत होती. या तीन महिन्यात तिला एकदा खूप एकटंही वाटलं. सगळं सोडून परत येते म्हणाली, पण पुन्हा जिद्दीने उभी राहीली. मराठी घरात, एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या तिचं धाडस तिनं नंतर पुस्तक रुपानं समोर आणलं. तेव्हा सगळ्यांनी तिचं केवढं कौतूक केलं… तेव्हा मला झालेला आनंद या लेखातून नाही मांडता येणार… अशी ती धाडसी महिला… माझी पत्नी… जीवनसाथी… दीपा…!
नवरात्रीच्या निमित्तानं माझ्या आयुष्यावर प्रभाव असलेली, टाकलेली महिला या विषयावर लिहून देता का? असा मेसेज मला माझा मित्र मनोज गडनीस यांनी पाठवला. प्रभाव पाडणारी महिला आई, पत्नी, मैत्रीणी, बहिण, मुलगी कुणीही असू शकेल. अगदी मोकळेपणानं लिखाण करा, त्या महिलेच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट, तुम्हाला भावलेले गुण, एखाद्या विशिष्ठ प्रसंगाची आठवण अशा काही मुद्यांचा अंतर्भाव करता येईल असंही त्यानं कळवलं होतं. नवरसातील वीर रस ओतप्रोत असणारी दीपा… माझी प्रेरणा… माझ्या घरातच तर होती…! त्यामुळे मी मनोजला तात्काळ होकार कळवला. तिच्याबाबतीत घडलं ते असं –
माझी एकुलती एक मुलगी गार्गी. ती टोरोंटो मध्ये शिकते. तिच्या यॉर्क युनिर्व्हसिटीकडून तिची निवड ऑस्ट्रीयाच्या व्हिएन्ना युनिर्व्हसिटी येथे एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत झाली. ती पाच सहा महिने तिथं रहाणार होती. या काळात तिच्या मदतीसाठी म्हणून दीपा तिच्याकडे गेली. तीथं जातच आहोत तर ऑस्ट्रीया आणि आजूबाजूचे काही देश जमलं तर फिरुन पाहू असं तिनं ठरवलं होतं. जाताना अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते, एकटी जाणार..?, एकटीनं जाणं सुरक्षीत आहे का?, तुला एकटीला रहायला भीती नाही का वाटणार..?, जर तुझी ट्रेन, किंवा फ्लाईट चुकली तर..?, तू कुठे हरवलीस तर…? ती ज्यांना कोणाला जाण्याबद्दल सांगत होती, ते सगळे तिचं अशा अनेक प्रश्नांनी स्वागत करत होते..! (आपल्याकडे आजारी माणसाला भेटायला जाणारे नको नको ते आजार आठवून आठवून त्याचे कसे वाईट झाले, तुम्ही काळजी घ्या, हे सांगत असतात तसे) पण ही एकटी गेली.
तीथं गेल्यावर तिला कळालं की मुलीच्या हॉस्टेलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तीन चार दिवस रहाता येईल… ही तर तीन महिन्यानंतरच्या परतीचं तिकीट घेऊन गेलेली. काय करावे प्रश्न होता. पण तिने तो सोडवला आणि केवळ माझ्यासाठीच नव्हे तर एकट्याने प्रवास करणाऱ्या सगळ्या मुलींसाठी ती प्रेरणा ठरली.
तीथं गेल्यावर तिनं ऑस्ट्रीया आणि आजूबाजूच्या देशांचा नकाशा पाहिला. जवळपास अनेक देश होते. काही ठिकाणी ट्रेनने, काही ठिकाणी बसने जाता येण्यासारखी स्थिती. तेव्हा तिनं ठरवलं की काही ठिकाणी आपण जाऊन तर पाहू… आणि सुरुवातीला काही जवळचे देश फिरायचं ठरवलं. जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं, कोणतही बुकिंग नाही, कोणतही अॅडव्हान्स तिकीट काढलेलं नाही. बस आणि ट्रेनचे तिकीट काढायचं, एक बॅग सोबत घेतलेली. असे करुन तिने तब्बल १३ देश फिरुन काढले. अनेक अनुभव या काळात तिला आले.
अनेकदा तिला एकटं ही वाटलं. मला इथे सतत काळजी वाटायची. हीने फोटो काढायला म्हणून कोणाला फोन दिला आणि तो फोन घेऊनच पळून गेला तर…? या प्रश्नापासून अनेक प्रश्न सतत माझ्या डोक्यात फिरत असायचे. तीन महिने ती तीकडे विविध देश फिरत राहीली आणि मी प्रश्नांच्या मागे फिरत राहीलो. वाटत असलेली भीती तिला बोलूनही दाखवता यायची नाही. कारण तशीच भीती तिला वाटू लागली तर… असा प्रश्न आला मी आणि गार्गी तिला प्रोत्साहन द्यायचो…! एका अर्थानं आम्ही आम्हाला धीर द्यायचो..! ती तर मस्त फिरत होती… न घाबरता…!
या काळात आलेले अनुभवही जीव खालीवर करणारे होते. एकदा प्रवासात तिच्या मोबाईलची बॅटरी संपली. तीच्या परतीचं बसचं तिकीट, बसचा नंबर मोबाईलमध्ये. इमेलवर. काय करावं तिला सुचेना. ती एका कॉफी शॉपमध्ये गेली. दोघांची भाषा एकमेकांना कळेना. शेवटी तिला कळाले ही लिहा चार्जर हवायं… तिने दिलेला चार्जर हिच्या मोबाईलला लागेना. खाणाखुणा करुन तिने तिचा कॉम्प्युटर वापरता येईल का? असं विचारलं. त्या कॉफी शॉपमधल्या बाईला कदाचित हीची अडचण समजली असावी. तिनं तीला कॉम्प्युटर दिला. तिनं इमेल अॅक्सेस करुन तिकीटाचं प्रिंटआऊट काढलं. तिला धन्यवाद दिले. कॉफीशॉपच्या बाहेर आली, थोडे चालत पुढे गेली तर तिची बस तेथे आलेली… त्यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू मला तिनं न सांगताही दिसले होते…
चार दिवसासाठी तिने एक घर ऑनलाईन बुकींग करुन रेंटवर घेतलं. ऑनलाईन पैसे भरले. तेव्हा तिला एक मेल आला. त्यात एक अॅड्रेस दिला होता. तुम्ही या अॅड्रेसवर जा, तिथे अमुक मजल्यावर अमूक ठिकाणी एक रुम आहे. त्याला डिजीटल लॉक आहे. त्याचा हा पिनकोड, तो टाईप करा, दार उघडेल. आत आणखी एक दार आहे. त्याचा नंबर अमूक अमूक आहे. तो टाईप केला की एक बेडरुम, किचन तुमचे स्वागत करेल. पीनकोड आणि नंबर तुम्ही जेवढ्या दिवसाचे बुकींग केले आहे तेवढे दिवस असतील. त्यानंतर ते आपोआप चेंज होतील. तिनं मला हा सगळा किस्सा सांगितला. मी म्हणालो, कोणीतरी फसवलेलं दिसतयं. असं कुठे असतं का..? पण जसं मेलमध्ये होतं अगदी तसचं घडलं. आतमध्ये फ्रीजमध्ये दूधाची बाटली, चहा, कॉफीचे सॅशे, काही ताजी फळ ठेवलेली होती. आपल्याकडे असं काही… असो….
पण हिंमतीनं आणि जिद्दीनं तीनं ते तीन महिने एकटीनं प्रवास करुन दाखवला. आल्यानंतर ती सगळे अनुभव सांगत होती. त्यातून तिनं काढलेले फोटो पहाताना याचं पुस्तक का करु नये असा प्रश्न मनात आला, आणि तिच्या अनुभवांचं, तिनं पाहिलेल्या युरोपचं अतीशय सुरेख असं पुस्तक निघालं. ”युरोप : इटस् जस्ट हॅपन” हे पुस्तकाचं नाव. हे पुस्तक आता बुकगंगा, आणि अॅमेझॉनवरही उपलब्ध आहे. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी लोकमतचे ऋषी दर्डा, दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता मकरंद अनासपुरे अशा अनेकांची उपस्थिती होती. सगळ्यांनीच तिच्या या धाडसाचं कौतुक केलं. मी कुठंही एकटा जाऊ शकत नाही… मला सतत कोणाची तरी सोबत हवी असते… त्यामुळं माझ्यासाठी तर ती नक्कीच प्रेरणा आहे…! या पुस्तकात तिनं एका ठिकाणी लिहीलेलं मुद्दाम तुमच्यासाठी देतोय…
हंगेरी, बुडापेस्ट : मी माझ्यासाठी जगताना… (युरोप : इटस् जस्ट हॅपन पुस्तकातून अनुवादित)
”हंगेरी देशाची राजधानी बुडापेस्ट. बुडा आणि पेस्ट अशा दोन गावांपासून बनलेली राजधानी बुडापेस्ट. नैसर्गिक गरम पाण्याच्या वाहत्या झऱ्यामुळे असेल की काय; पण खूप उबदार आणि स्वागतासाठी उत्सुक असलेला हा देश वाटला मला… यंत्रांवर अवलंबून राहिल्याने काय काय सोसावं लागतं याचा धडा देणारा हा देश. आपण कसे कागद आणि पेन विरहित जगात चाललोय हे मी ऐकलं होतं पण तो अनुभव मला या देशाने दिला. हा देश आणि ही राजधानी मला आणखी एका कारणासाठी कायम लक्षात राहील. आज पर्यंत कधी नवऱ्यासाठी, कधी मुलीसाठी, कधी नातेवाईकांसाठी अशीच मी जगत आले. मात्र या देशात मी स्वत:साठी म्हणून खाण्याच्या वस्तू विकत घेतल्या, स्वत:साठी जेवण बनवलं, आणि मी एकटीने ते खाल्लं… खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा मी घेतलेला हा वेगळा अनुभव होता…!”
Comments