तिच्या जीद्दीची आणि मेहनतीची कहाणी…!
(नवरात्रीच्या तिसऱ्या माळेच्या निमित्ताने)
– अतुल कुलकर्णी
त्या दोघी सख्ख्या बहिणी. लहानपणी आधी तिची बहीण कॅन्सरमुळे गेली. पुढे काही वर्षातच तिचे वडील ही कॅन्सरमुळे गेले. तिची आई आणि ती. दोघीच. मनावर दगड ठेवून तिने स्वत:ला सावरले. स्वत:च्या मुलीसाठी ती उभी राहीली. हिमतीने. तीचे शिक्षण पूर्ण केले. मुलगी इंजिनियर झाली. कॉलेजमध्ये पहिली आली. तीचे कॅम्पस इंटरव्ह्यूव मध्ये सिलेक्शनही झाले. आता ती पुण्यात टीसीएस या नामवंत कंपनीत काम करत आहे…! ही कथा आहे लातूर सारख्या छोट्या शहरातल्या एका मुलीची. मला सांगायला अभिमान वाटतो की ही मुलगी माझ्या सख्ख्या बहीणीची एकुलती एक मुलगी आहे… चिन्मयी सतीश कुलकर्णी तिचं नाव.
अनघा ही माझी एकुलती एक सख्खी बहीण. दोन मुली आणि ते दोघे असा सुखी परिवार होता. भाऊजी सरकारी नोकरीत होते. त्याच काळात त्यांची मोठी मुलगी आजारी पडल्याचे निमित्त झाले आणि तिला कॅन्सर निघाला. त्यात ती सगळ्यांना सोडून गेली. पुढे वर्षभरातच आजारी पडल्याचे निमित्त झाले आणि भाऊजींना कॅन्सर निघाला. ते देखील फार काळ त्याचा सामना करु शकले नाहीत. घरात असे घडल्यानंतर बहिणीला मी लातूरला आणले. माझ्या घराजवळच एक प्लॉट तीने घेतला. घर बांधले. ती आणि तिची मुलगी तेथे राहू लागले. मदतीला माझा लहान भाऊ त्याचा परिवार आणि आई तेथे आहेत.
या पार्श्वभूमीवर तिने आपल्या मुलीला मोठे केले. वाढवले. बांधलेल्या घरात मुलींसाठी हॉस्टेल ही चालवायची. पेन्शन आणि हॉस्टेल या पैशात तीने मुलीचे शिक्षण पूर्ण केले. तीने इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्यूनिकेशनमध्ये बी. ई. केले. ग्रॅज्यूएशन नंतर पुण्यात तिला नोकरी लागली. कधीही घराबाहेर न पडणारी मुलगी, पुण्यात मैत्रीणींसोबत रुम करुन राहू लागली. नोकरीच्या निमित्ताने. सुदैवाने तिला अत्यंत चांगले वर्क कल्चर असणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपनीत पहिली संधी मिळाली आहे. आज ती तीच्या सीव्ही मध्ये ‘कॉन्फीडन्ट, ऑप्टीमेस्टीक, टीम प्लेअर, गुड कम्यूनिकेशन स्कील’ ही विशेषणं ज्या ठामपणे लिहीते तशीच ती ठाम आहे. परिस्थितीची पूर्ण जाणीव तीला आहे. कशा स्थीतीतून आपण आज इथपर्यंत आलोय हे तीला चांगलं माहिती आहे.
नोकरीत मिळालेल्या पहिल्या पगारातून तीने स्वत:च्या आईसाठी मोबाईल घेतला. तिला व्हॉटसअप डाऊनलोड करुन दिले. कसे वापरायचे ते ही शिकवले. आता लॉकडाऊनमुळे वर्क फॉर्म होम चालू आहे. पण एवढ्या लहान वयात तिने हे जे काही मिळवले ते शब्दातीत आहे. आज मी आणि माझी पत्नी दीपा नेहमी म्हणतो, आम्हाला एक नाही तर दोन मुली आहेत. एक गार्गी आणि दुसरी चिन्मयी. नवरात्रीच्या आजच्या तिसऱ्या माळेच्या निमित्ताने यापेक्षा चांगली प्रेरणा देणारी, स्टोरी दुसरी कोणती असू शकते..?
Comments