गुरुवार, ९ जानेवारी २०२५
9 January 2025

टोमॅटोची कोशिंबीर… आणि ‘सौं’ची भेळ…

अधून मधून / अतुल कुलकर्णी

बंडूच्या आईने हातात पिशवी देत भाजी आणायचे फर्मान सोडले. हळूच दाराशी येऊन म्हणाली, मोजून दोन टोमॅटो आणा. आज आमची भिशी पार्टी आहे. सायंकाळी भेळ करणार आहे. आपण टोमॅटो खातो हे दाखवायला नको का सगळ्यांना! मग मी दोन जास्तीचे टोमॅटो आणतो ना. तुझ्या हातची, शेंगदाण्याचे कुट पेरलेली, घट्ट दही घालून केलेली कोशिंबीर खाऊन खूप दिवस झाले… थोडी कोथिंबीर पण टाक, आणि जिऱ्याची फोडणीही…

तब्येत बरी आहे ना तुमची…? टोमॅटोची कोशिंबीर खाण्याचे दिवस आहेत का हे..? की दसरा-दिवाळी… नको ते लाड काय कामाचे..? अगं पण तुमच्या भिशी पार्टीत भेळेवर टोमॅटो घालणार आहेस ना. मग आम्हाला टोमॅटोची कोशिंबीर दिलीस तर काय बिघडले… मी कालच इन्स्टावर चाकूची जाहिरात पाहिली. तो मागवलाय. त्या चाकूने टोमॅटोचे बारीक, बारीक तुकडे करणार. दहा भेळीवर एक टोमॅटो पुरेल… एक ठेवते बाजूला… अग पण तू टोमॅटो भेळेवर टाकल्यानंतर बायका खाणार ना ते… कोणी जर आणखी थोडा टोमॅटो टाका, असे सांगितले तर काय सांगशील…

मी भिशी पार्टीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘उत्तम सजावटीची भेळ’ बनवणार असे सांगितले आहे. टोमॅटो कोथिंबिरीमुळे भेळ सजलेली दिसेल. तुम्हाला म्हणून सांगते, थोडी तिखटच करणार आहे… म्हणजे ऑटोमॅटिक कमी खातील सगळ्या जणी… जास्त वाद घालण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच मी मंडईची वाट धरली. जे हवे ते आणून दिले. दिवसभर भिशी पार्टीची तयारी करायची म्हणून हिने दुपारचे जेवण बाहेरून मागवले. त्याचे हजार-बाराशे रुपये देताना मला ते जेवण बेचवच लागले; पण ते सांगण्याची हिंमत नव्हती…

संध्याकाळी भिशी पार्टी सुरू झाली. आमच्या हिने आधी सगळ्यांना वेलकम ड्रिंक म्हणून मोठमोठे ग्लास भरून मठ्ठा प्यायला दिला… पाच-सहा जणी तर मठ्ठ्यातच गार झाल्या… नंतर टोमॅटो पेरलेली भेळ सगळ्यांना दिली…

काही जणींचे डोळे लगेच चकाकले. आमच्या शेजारच्या सुलूची आई म्हणालीच, अय्या, टोमॅटो टाकलेली भेळ… किती छान… हिच्या चेहऱ्यावर कृतकृत्य भाव होते…

भेळ खात त्यांच्या गप्पा सुरू होत्या. त्याचवेळी ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट घडलीच. सुलूची आई म्हणाली, वहिनी, मला आणखी थोडा टोमॅटो टाकाल का… भेळ मस्त लागते… भेळेचा तिखटपणाही कमी होतो…

आमच्या हिने ते ऐकून न ऐकल्यासारखे केल्याचे सोसायटीच्या सेक्रेटरी बाईच्या लक्षात आले. ती भसकन बोलली, अहो वहिनी मला सांगायचं ना… आमचे हे मार्केट कमिटीत बॉस आहेत. आज सकाळीच पेटीभर टोमॅटो आणलेत त्यांनी… थांबा, मी आत्ता मागवते… आणि तिने फोन करून मुलाला टोमॅटो आणायला सांगितले. तिचा मुलगा पिशवीत तब्बल वीस-पंचवीस टोमॅटो घेऊन आला. मला तेवढे टोमॅटो पाहूनच गरगरले. आमची ही म्हणाली, भेळ जरा जास्तच तिखट झाली आहे ना… आमच्या ह्यांना तिखट खूप आवडते… म्हणून जरा जास्त तिखट टाकलंय… मला तर बाई डोळ्यांतून पाणीच येतं… तिखट खाताना… असं म्हणत तिने हळूच पदराने डोळेही पुसून घेतले…

पार्टी संपली. सगळ्या घरी निघून गेल्या. तुम्हाला नाही का त्या मार्केट कमिटीत बदली करून घेता येत..? सौ.नी घुश्श्यातच विचारले… मी विषय टाळण्यासाठी व ताण कमी करण्यासाठी म्हणालो, अरे वा, तुझी भिशी लागली… चला सेलिब्रेट करू… तुझ्याऐवजी मीच टोमॅटोची कोशिंबीर करतो… त्या क्षणी तिने नवाकोरा चाकू माझ्या दिशेने भिरकावला. कसाबसा मी स्वतःला वाचवून घराबाहेर पडलो… आता उशिरा घरी जावं म्हणतोय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *