राष्ट्रवादी वेगळी भूमिका अजिबात घेणार नाही : उध्दव ठाकरे
आम्हाला हरवता येत नाही मग बदनाम करणे सुरु : ठाकरे
उपऱ्यांच्या सल्ल्याने पक्ष चालवतात : उध्दव ठाकरे यांची भाजपवर टीका
अतुल कुलकर्णी / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची एकदम वेगळी भूमिका राष्ट्रवादी पक्ष अजिबात घेणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी. पण तीही त्यांना शक्य होणार नाहीत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगावला. आम्हाला हरवता येत नाही ना मग, बदनाम करा… या वृत्तीने भाजप वागत आहे. याच पंचवीस वर्षाच्या सहकाऱ्याने आमचा विश्वासघात केला, हे एकमेव आणि कधीही न विसरता येणारे शल्य आहे. भाजप आता उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. त्यांच्याच पक्षातले जुनेजाणते नेते त्यांनी बाजूला ठेवले आहेत अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केली.
कोण काय बोलतो याची वेगळी उत्तरे मी देत बसणार नाही. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीनेच लढवल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षातली कधीही न विसरता येणारी आठवण कोणती असे विचारले असता ठाकरे म्हणाले, वर्षाच्या सुरुवातीलाच आमच्या २५ते ३० वर्षे जुन्या सहकाऱ्याने आमचा विश्वासघात केला. हेच कधीही न विसरता येणारे दु:ख. बाळासाहेब ठाकरे ज्या खोलीत बसून काम करायचे ती खोली आमच्यासाठी देवघर. आजही आम्ही एखादे चांगले काम झाले किंवा काही नवीन घडले तर त्या खोलीत जाऊन नतमस्तक होतो. इतरांसाठी ती खोली असेल पण आमच्यासाठी ते सर्वस्व आहे. त्या खोलीत बसून दिलेला शब्द त्यांनी फिरवला. विश्वासघात केला गेला. तेथूनच माझ्या नव्या वर्षाला सुरुवात झाली असेही ते म्हणाले. त्यांच्याशी झालेली ही थेट बातचित.
भाजप बद्दल आपल्या मनात एवढा राग का आहे? आणि भाजपचे प्रवीण दरेकर, राम कदम, प्रसाद लाड असे नेते आपल्यावर सतत टीका करत आहेत. हे तुम्ही कसे पहाता..?
: आज सरकारला वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून आपण बोलत आहोत. अशावेळी विकृत लोकांची नावे तरी कशाला घेता… २५ वर्षे आम्ही काय भोगले आम्हाला माहिती आहे. आमच्या मित्राच्या मनात पाप होते. त्यांचे मन काळे होते. हे या वर्षात ठामपणे समोर आले. आम्ही कधी कुटुंबावर आरोप केले नाहीत पण त्यांनी ते देखील केले. हा पक्ष आता उपऱ्यांच्या सल्ल्याने चालला आहे. त्यांना कार्यकर्ते घडवता आले नाहीत म्हणून इकडून तिकडून लोक घेणे सुरु केले. जुन्या निष्ठावंतांना डावलले गेले. एकनाथ खडसे यांचासारखा नेता पक्ष का सोडून गेला. त्यांचा पक्ष कसा चालवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. मी ते सांगणार नाही, त्यांनी देखील ते सांगण्याचा प्रयत्न करु नये. आम्हाला देखील खूप बोलता येईल.
पण भाजपमधील काही ज्येष्ठ नेते या सरकारच्या कामावर टीका करत नाहीत, सुधीर मुनगंटीवार, प्रकाश मेहता असे नेते काही बोलताना दिसत नाहीत. त्यांना पक्षात जे चालले आहे ते पटत नाही असे वाटते का?
: कारण ते जुन्या पिढीतले नेते आहेत. त्यांना जर असे वाटत असेल तर मी त्यांचे कौतूकही करतो आणि त्यांच्याविषयी मला सहानुभूती ही आहे. त्यांना हिंदुत्वाचा अर्थ कळालेला आहे. मी अजूनही कोणाचे कुटुंब, पत्नी, मुलं याविषयी बोललेलो नाही. कारण आमचा तो संस्कार नाही. संस्कार नसणारेच असे वागतात. जुन्या नेत्यांना काही वेगळी राजकीय व्यवस्था हवी आहे का? या खोलात व तपशिलात मी जात नाही. भाजपचे पूर्वीचे राजकारण वेगळे होते, आताचे राजकारण विकृत झाले आहे.
जर भाजपने मुख्यमंत्रीपदी तुम्हीच रहा, आपण सरकार बनवू असे सांगितले तर ते तुम्ही मान्य करणार का?
: आता ती वेळ निघून गेली. त्याला काही अर्थ नाही. आज आम्ही यांच्यासाठी वाईट झालो, या आधी आम्ही वाईट नव्हतो का? प्रत्येकवेळी मीच का टपल्या मारुन घेऊ…? दिवस सगळयांचे सारखे नसतात. काळ बरोबर निर्णय घेत असतो. आता त्या बोलण्याला काही अर्थ नाही.
तुम्ही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सल्ल्याने वागता, असे बोलले जाते. तुम्हाला हे मान्य आहे का?
: शरद पवार आणि आमच्या परिवाराचे संबंध बाळासाहेब असल्यापासून आहेत. राजकीय संबंध देखील आहेत. ते जेव्हा येतात तेव्हा मी काही पाटी पेन्सील घेऊन अभ्यासाला बसल्यासारखा बसत नाही. ते अनुभवाचे बोल सांगतात. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांमध्ये त्यांनी काय केले होते हे सांगतात. या परिस्थितीत काय केले पाहिजे हे सांगतात. त्यामुळे त्याचा फायदाच होतो.
सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षाकडे तुम्ही कसे पहाता? काय मिळवले, काय गमावले?
: आमचे सरकार दोन महिने सुध्दा चालणार नाही असे म्हणणाऱ्यांना या वर्षाने योग्य ते उत्तर दिले आहे. मी अनपेक्षीतपणे ही जबाबदारी स्वीकारली. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे सहकार्य आहे. तसेच बाळासाहेब थोरात, अजित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील यांनी उत्तम संवाद ठेवला आहे. या वर्षभरात आम्ही कोविडसाठीचे लाखांच्यावर बेड बनवू शकलो. कोरोना तपासणीची दोन ठिकाणं राज्यात होती, आज आपल्याकडे ४५० तपासणी केद्र सुरु आहेत. चीनने १५ दिवसात कोविड हॉस्पीटल उभे केले पण भारतात एकमेव महाराष्ट्राने देशातले सर्वात मोठे कोविड हॉस्पीटल मुंबईत १७ दिवसात उभे केले. या संकटातून बाहेर पडत असताना आम्ही भविष्यात असे संकट आले तर त्यावर कशी मात करायची यासाठीचे रेकॉर्ड तयार करणे सुरु केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. नैसर्गिक संकटावर मात करताना पॅकेज दिले. हजारो कोटींचे एमओयू केले. रेमिडीसिवीर उपलब्ध नव्हते त्या काळात आम्ही धारावी कोरोनामुक्त करुन दाखवली. ज्याचे जगाने कौतूक केले.
महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षात समन्वय नाही, एकवाक्यता नाही असे बोलले जात आहे. त्याचे कसे खंडन कराल?
: आमचे तीन पक्षांचे सरकार आहे. तीघे भीन्न विचारांचे आहेत असे म्हणत असाल तरीही ‘राज्याचे हीत’ हा आमच्यातला समान विचार आहे. विश्वासघात हा आमच्या तीघांचा गूण नाही. त्यामुळे आमचे व्यवस्थीत चालले आहे. तीघांमध्ये उत्तम समन्वय आहे. प्रत्येकाने आग्रही रहाणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आमच्यात ते आहे.
तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मेट्रोचे कार शेड कांजूरमार्गला नेले. त्यावर भाजपने टीका केली. त्याचे तुम्ही उत्तर दिलेले नाही. असे का..?
: कांजूरमार्गला कार शेड नेणे का आवश्यक होते यावर मी एक स्वतंत्र प्रेझेटेशन करणार आहे. ते सगळयांना दाखवणार आहे. याचा फायदा कल्याण, डोबिवली, वर्साेवापर्यंत कसा होणार आहे हे ही सांगणार आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित करायचे, त्यावर मी काही तरी उत्तर द्यायचे, या सवाल जबाबाला काही अर्थ नाही. कांजूरमार्गची जागा आमची आहे हे केद्र सरकारला आत्ताच कळाले का? जे कोणी बिल्डर जागे झाले ते आणि केद्र सरकार एवढे दिवस झोपले होते का? आजच कशी जाग आली या लोकांना? या सगळयांची उत्तरे मी मुंबईकरांना आणि राज्याला त्या प्रेझेटेशनमधून देणार आहे.
मध्यंतरी वरिष्ठ पोलिस अधिकारी देवेन भारती यांच्या चौकशीसाठी संजय पांडे यांची समिती नेमली होती, त्यांचा अहवाल आला असून शिक्षेची शिफारस त्यांनी केली हे खरे आहे का?
: अद्याप असा कोणता अहवाल आलेला नाही. वर्षपूर्तीचा आणि त्याचा तसा संबंधही नाही. अहवाल आला की सांगेन.
मध्यंतरी आयपीएस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचित केले होते. त्यावर आपण काय सांगाल?
: मी पूर्वगृह दूषित ठेवून कोणत्याही घटनेकडे पहाणार नाही. तसे बघणे उचितही नाही. आम्ही सक्षम आहोत आणि यावर गृहमंत्र्यांनी योग्य ते उत्तर दिले आहेच व कृतीही केली आहे. मी कोणत्याही मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही.
केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे अडतीस हजार कोटी रुपये देत नाही, असे आपण सांगितले आहे. अन्य राज्यांची देखील ती अवस्था असेल तर तुम्ही भाजपेतर राज्यांनी एकत्रित येऊन काही भूमिका घेणार का?
: मी यावर आज तरी काही स्पष्ट बोलणार नाही. मात्र ज्या राज्यांना केंद्राकडून हक्काचे पैसे मिळाले नसतील त्या राज्यांनी याविषयी आपले मत मांडणे गरजेचे आहे. जर त्यांना पैसे मिळाले असतील तर त्यांनी ते कसे मिळवले हे आम्हाला सांगावे. आम्ही देखील तो मार्ग स्वीकारू. मात्र त्यांना पैसे मिळाले नसतील तर त्यांनी तसे सांगावे व त्यावर भूमिका घ्यावी.
भाजपेतर राज्यांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी आणि त्याचे नेतृत्व आपण करावे असे आपल्याला वाटते का? आपल्याला दिल्लीच्या राजकारणात जाण्याची इच्छा आहे का?
: आज तरी माझा तसा कोणता विचार नाही. मी दिवसाढवळ्या अशी स्वप्न पहात नाही. मी पुन्हा येईन असेही मी कधी म्हणत नाही, न म्हणताच मी इथे देखील आलोय. काम करणे हा माझा स्वभाव आहे. जे आवाक्यात आहे ते करावे व आपली वाटचाल चालू ठेवावी यावर माझा विश्वास आहे.
Comments