कोण खरे, कोण खोटे, आघाडीवर संक्रात हेच खरे
अधून मधून / अतुल कुलकर्णी
महाविकास आघाडीचे नेते हो, कालच आपली वैचारिक घुसळण पाहिली. समाधान वाटले. निदान आपल्याकडे तरी लोकशाही जिवंत आहे याचा पुरावा आपण दिला. ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही… काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही… असे मौलिक मुद्दे शरद पवार गटाचे नेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडले. कोल्हे डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अचूक निदान करता आले. त्यांनी आता शरद पवार गटाचेही नेमके निदान केले पाहिजे. जयंत पाटील आणि रोहित पवार या दोघांमधली जवळीक आणि प्रेमाचे संबंध पक्षातल्या प्रत्येकामध्ये कसे तयार होतील, यासाठी त्यांनी एखादी मात्रा शोधायला हवी. बचेंगे तो और भी लढेंगे हा मंत्र डॉ. कोल्हे यांनी नेमका कोणाला दिला? याचीही चर्चा आहे. हा मंत्र त्यांनी जयंत पाटलांना दिला की रोहित पवार यांना..? असो. डॉक्टरांना प्रश्न विचारायचे नसतात… काँग्रेसकडेही डॉक्टर नाहीत असे नाही… विजय वडेट्टीवार प्रभावी नेते आहेत. ते फक्त स्वतःच्या नावामागे डॉक्टर शब्द लावत नाहीत एवढेच काय ते… त्यांनी तत्काळ महायुतीच्या निकालाचा एक्स-रे डॉक्टर कोल्ह्यांना दाखवला. विद्यमान सरकार ईव्हीएमच्या भरवशावर आलेले आहे. डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या पक्षाकडून जागावाटपाचा तिढा लवकर संपवला असता, तर चित्र वेगळे राहिले असते, असे निदान डॉक्टर वडेट्टीवार यांनी केले आहे…

उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत हे तर एकदम भारी. “मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कंपाउंडरकडून औषध घेतो. कारण त्यालाच जास्त कळते…” असे विधान राऊत यांनी केले होते. या विधानावर राऊतांचा आजही ठाम विश्वास. त्यामुळे एक स्वयंघोषित आणि दुसरे घोषित डॉक्टर राऊत यांच्या काय कामाचे..? जागावाटपाच्या चर्चेत कोण होते? कोणी कोणाला कमी जागा सोडल्या? याचा हिशोब कंपाउंडरकडून ट्रीटमेंट घेणाऱ्या राऊत यांनी दिला. सोबत तुम्ही आता आत्मचिंतन करा, असे प्रीस्क्रिप्शनही दोघांना लिहून दिले आहे. महाविकास आघाडीत इतके खेळीमेळीचे वातावरण पाहून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एकदम भारावून गेले असतील. ही अशी भांडणे म्हणजे जिवंत मनाचे लक्षण आहे. अशा भांडणातून प्रेम वाढते, असा निष्कर्ष काढणारा मौलिक लेख राऊत लवकरच लिहितील, याविषयी आमच्या मनात शंका नाही. महायुतीचे सरकार आले. त्यांच्याकडे कसे खेळीमेळीचे वातावरण आहे बघा जरा… धनंजय मुंडे चारी बाजूने घेरले गेले आहेत, तरीही अजित पवार त्यांना कुठला सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तुम्ही केले, तुम्ही निस्तरा… दादांनी अशी स्वच्छ, निर्मळ भूमिका घेतली आहे… अशी भूमिका घेता आली पाहिजे… (‘दादा’गिरीतून राजकीय विकास) हा विषय बीड जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून शालेय पाठ्यपुस्तकात घेतला पाहिजे. असो.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी असेच रोज नव्या नव्या विषयांवर भांडण उकरून काढावे. एकमेकांवर आरोप करावे. त्यातून ‘भांडा, सौख्यभरे…’ हा विचार पक्षात सर्वत्र रुजेल. आता पाच वर्षे विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका नाहीत. यावेळी काही नेते खासदारकीला उभे होते. तिथे पडल्यामुळे ते आमदारकीला उभे राहिले. तिथेही ज्यांना यश आले नाही. त्यांना आता महापालिका निवडणुकांमध्ये संधी आहे… गेल्या बाजार महापौर तरी होता येईल किंवा स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन तरी… प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे… १४ तारखेला मकर संक्रांत आहे. यानिमित्ताने तुम्ही जी पतंगबाजी सुरू केली आहे, ती अशीच चालू ठेवा. महागाई वाढली आहे. भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. बीडमध्ये सरपंचाचा निर्दयपणे खून झाला. तो विषय भाजपचे सुरेश धस बघून घेतील. त्या मुद्द्यावरून विनाकारण अजितदादांना प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडू नये. त्याच्याशी आपले काही घेणे देणे आहे का..?
गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर खाली उतरत नाहीत. दाढी, कटिंगचेही भाव नव्या वर्षात वाढले आहेत. गोड खाल्ले तर जीएसटी लागतो. अनेक शहरात प्रदूषणानेसुद्धा स्वतःचा दर वाढवला आहे… तो तरी का मागे राहील… हे असे फालतू विषय विनाकारण काढत बसू नका. त्यापेक्षा महाविकास आघाडीत कोण कुठे चुकले, याचा हिशोब जाहीरपणे मांडा… एकमेकांशी जोरजोरात भांडा… मूळ विषय बाजूला ठेवून भांडत राहा… भाजपवाले वेडे आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आपण तसे करायचे गरज नाही. आपल्याला इतरही कामं आहेत. जे चालू आहे असेच चालू ठेवा. जाता जाता : संजय राऊत यांनी स्वबळाची भाषा केली आहे. एकदा काय ते होऊनच जाऊ द्या असे त्यांचे म्हणणे आहे. आता इतके सगळे घडले बिघडलेले बघून झाले. आता काय बघायचे बाकी आहे..? त्यासाठीच राऊत यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. भेट मिळाली की वृत्तांत देऊ…
– आपलाच बाबूराव
Comments