शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

नाट्यगृहाचा गळा घोटल्याची जबाबदारी कोण घेणार?

अतुल कुलकर्णी

साधारणपणे २००४-०५ या वर्षातली ही गोष्ट. तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये सिडकोने सुसज्ज नाट्यगृह बांधले. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटनाच्यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी हे नाट्यगृह आता आम्ही महापालिकेला हस्तांतरित करत आहोत असे सांगितले. तेव्हा विलासराव देशमुख यांनी, या सुंदर नाट्यगृहाची अंतर्गत रचना, बाहेरील इमारत असे वेगवेगळे फोटो आताच काढून ठेवा. एकदा का हे महापालिकेच्या ताब्यात गेले, की हे नाट्यगृह केवळ फोटोतच बघायला शिल्लक राहील, असे विधान केले होते. आज विलासराव देशमुख नाहीत. मात्र त्यांचे विधान छत्रपती संभाजीनगर महापालिकेने १००% खरे करून दाखवले आहे. गेले अनेक महिने ते नाट्यगृह बंद पडलेले आहे. वित्त मंत्री असताना सुधीर मुनगंटीवार लातूरला एका कार्यक्रमासाठी १७ जून २०१८ रोजी आले होते. तिथे त्यांनी सुसज्य नाट्यगृहाची घोषणा केली. त्यासाठी जुलै २०१८ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद देखील केली. मात्र साडेपाच वर्षे झाले तरीही लातूरला नाट्यगृह उभे राहिलेले नाही.

ज्या तळमळीने मुनगंटीवार यांनी आता सांस्कृतिक मंत्री या नात्याने महाराष्ट्रात ७५ नाट्यगृहे उभारण्याची घोषणा काही दिवसापूर्वी केली. त्या घोषणेचे देखील भविष्यात असे होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार?
माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टींची जशी गरज असते, तशीच त्याला साहित्य, कला, संस्कृती यांचीही तेवढीच गरज असते. सांस्कृतिक, साहित्यिक आघाडीवर महाराष्ट्र देशात कायम नंबर एक राहिला. चित्रपटाची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली. विष्णुदास भावे यांनी पहिले नाटक सांगलीच्या नाट्यगृहात केले. कलेचे माहेरघर म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी देशाची सांस्कृतिक पताका कायम उंचावत ठेवली. असे असताना आज महाराष्ट्र या आघाडीवर कुठे आहे? असा प्रश्न केला तर भीषण परिस्थिती आहे. जे कोणते सरकार सत्तेवर असेल त्यांनी राज्यात सांस्कृतिक आणि कलेचे वातावरण जोपासण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेतला पाहिजे. दुर्दैवाने महाराष्ट्रात असे काहीही होताना दिसत नाही.

नवीन नाट्यगृह उभारण्यापेक्षा, आहे त्या नाट्यगृहांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. बसण्यासाठी चांगल्या खुर्च्या, एसी हॉल, टॉयलेट बाथरूमच्या सुविधा या मूलभूत गोष्टीही मिळणार नसतील तर त्या ठिकाणी नाटकं होतील कशी..? नाटकांचे सगळ्यात जास्त प्रयोग महाराष्ट्रात होतात. नाटकवेडा मराठी माणूस आजही महाराष्ट्रात संख्येने प्रचंड आहे. आपल्या डोळ्यासमोर एखादे नाट्य घडताना… उत्तम अभिनयाचा अविष्कार साकार होतानाचे आपण साक्षीदार आहोत… ही अनुभूती मराठी माणसासाठी आजही अलौकिक आनंदाचा ठेवा आहे. अनेक ओटीपी प्लॅटफॉर्म आले. डिजिटल मीडिया वाढला. तरी देखील मराठी माणसाचे नाटकावरील प्रेम कमी झालेले नाही. शास्त्रीय संगीत असो किंवा सुगम संगीत. गाण्यांच्या कार्यक्रमाला जाणारा संगीतवेडा मराठी माणूस आजही प्रत्येक शहरात हजारोंच्या संख्येने आहे. आजही महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये दिवाळी पहाट होते. वर्षानुवर्ष ऐकलेली आणि सहज कुठेही उपलब्ध होणारी गाणी पुन्हा पुन्हा “याची देही याची डोळा” ऐकण्यासाठी मराठी माणूस आजही भल्या पहाटे सुट्टी असतानाही कार्यक्रमाला तुफान गर्दी करतो. प्रशांत दामले सारखा अभिनेता रंगभूमीवर नाटकांचे १३ हजार प्रयोग करतो. लता मंगेशकर, आर. डी. बर्मन, मदन मोहन, मोहम्मद रफी, किशोर कुमार, भीमसेन जोशी यांनी गाऊन ठेवलेल्या गाण्यांना पुन्हा पुन्हा ऐकायला रसिक नाट्यगृहात जातात. महेश काळे, राहुल देशपांडे सारखे तरुण पिढीचे गायक शास्त्रीय संगीताची आवड तरुण पिढीच्या मनात निर्माण करतात. त्यासाठी गावोगावी नाट्यगृहात जाऊन गाण्यांचे प्रयोग करतात. या अशा प्रयोगांमुळेच राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक सलोखा थोडा बहुत टिकून आहे.

मात्र या कलावंतांना सरकार काय देते? चित्रकला, शिल्पकला, नाटक, लावणी, अभंग, तमाशा ही महाराष्ट्राची बलस्थानं आहेत. त्यांच्यासाठी नाट्यगृह अल्प दरात उपलब्ध करून द्यायचे नाहीत तर कोणासाठी द्यायचे? नाट्यगृहांची भाडे हजारोंच्या घरात आहे. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या न्यायाने नाटकाची टीम घेऊन वेगवेगळ्या गावात जाऊन प्रयोग करणे सोपी गोष्ट नाही. उलट सरकारने या कामासाठी नाट्यगृहांचे दर अत्यल्प ठेवले पाहिजेत. तसे न करता नाट्यगृह बांधायचे. पुन्हा त्याची दुरुस्ती काढायची. पुन्हा ते बंद ठेवायचे, आणि त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदारांनी रग्गड पैसे कमवायचे. हेच जर महाराष्ट्रात चालू राहिले तर हळूहळू रंगमंचीय अविष्कार ही संकल्पनाच नष्ट होत जाईल. त्याचे पातक मात्र त्या त्या काळातल्या सरकारांवर येईल.

आजही जगाच्या कानाकोपऱ्यात संगीताचे, नाटकांचे एकेक वर्ष आधी बुकिंग होते. प्रत्येक देश आपल्या नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे मात्र असे काही करण्याचा विचारही कोणाच्या मनात येत नाही, यासारखे दुर्दैव नाही. एखादी इमारत कोसळली किंवा एखादा पूल पडला तर काही कोटींचे नुकसान होईल. मात्र रंगभूमीवरचे कलाविष्कार बंद झाले तर अख्खी पिढी संवेदनाहीन होईल. त्यांच्यामध्ये कसल्याच भाव भावना ऊरणार नाहीत. चित्रपटाने आपली भाषा कधीच बदलली आहे. अडीच तासाच्या सिनेमात अडीचशे मुडदे पाडण्याचे काम ॲनिमल सारखा सिनेमा करतो. बॉक्स ऑफिसवर तो कोट्यावधी रुपये कमवतो. दुसरीकडे कौटुंबिक नाती जो, भावभावनांना खतपाणी घालणारी, मनाची उत्तम मशागत करणारी रंगभूमी आम्ही दयनीय अवस्थेत ठेवणार असू तर आम्ही कसला समाज घडवत आहोत याचा विचार प्रत्येक लोकप्रतिनिधीने केला पाहिजे. हे होऊ द्यायचे की नाही याचा विचार सरकारने गंभीरपणे केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *