सोमवार, ३० डिसेंबर २०२४
30 December 2024

आरोग्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा शेवट असा का होतो?

 

अधून मधून / अतुल कुलकर्णी

प्रिय प्रकाश आबिटकरजी,

नमस्कार, आपण आरोग्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन! जे आरोग्य मंत्री होतात त्यांना पुढे राजकीय भवितव्य उरत नाही. हा इतिहास आहे. आपल्याविषयी कोणालाही विचारताच, ‘खूप चांगला, तळमळीने काम करणारा नेता आहे…’ अशीच प्रतिक्रिया येते. हा चांगुलपणाच आपल्या हातून तो इतिहास बदलेल याची आम्हाला खात्री आहे. म्हणून हा पत्रप्रपंच. १२ मार्च १९८५ ते २६ जून १९८८ या कालावधीत भालचंद्र भाई सावंत आरोग्यमंत्री होते. त्यांच्या काळात जे.जे.हॉस्पिटलमध्ये उद्योगाला पुरवण्यात येणारे ग्लिसरीन रुग्णांना दिले गेले. त्यातून किडनी फेल झाल्याने १३ पेशंट दगावले. त्यावर जस्टसी लेंटिन यांचे कमिशन नेमले गेले. त्यांचा अहवाल आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी कपाटातच ठेवला; मात्र भाई सावंत यांची राजकीय कारकीर्द फुलली नाही.

६ मार्च १९९३ ते १८ नोव्हेंबर १९९४ या कालावधीत पुष्पाताई हिरे आरोग्यमंत्री होत्या. त्यावेळी मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न समोर आला. नंतर त्याही सक्रिय राजकारणात दिसल्या नाहीत. त्यांच्यानंतर दोनवेळा दौलतराव आहेर आणि एकवेळ बबनराव घोलप आरोग्यमंत्री झाले; पण दोघांचीही राजकीय कारकीर्द या मंत्रिपदाच्या पुढे गेलीच नाही. २७ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३ या काळात दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री होते. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ९ नोव्हेंबर २००४ ते १ डिसेंबर २००८ काळात विमल मुंदडा आरोग्यमंत्री झाल्या. त्यानंतर विमलताईंच्या राजकीय कारकिर्दीचे काय झाले? ८ डिसेंबर २००८ ते ६ नोव्हेंबर २००९ राजेंद्र शिंगणे आरोग्यमंत्री झाले. आज त्यांची राजकीय कारकीर्द कशी व कुठे आहे, हे आपण पाहतच आहात..! ७ नोव्हेंबर २००९ ते २६ सप्टेंबर २०२४ अशी मोठी कारकीर्द काँग्रेस नेते सुरेश शेट्टी यांना मिळाली. त्यांनी चांगले काम करण्याचे प्रयत्न केले; मात्र तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जेरीस आणले. परिणामी त्यानंतर शेट्टी निवडणुकीत पराभूत झाले. पुढे त्यांना उमेदवारीसुद्धा मिळाली नाही.

युती सरकारच्या काळात ५ डिसेंबर २०१४ ते ७ जानेवारी २०१९ अशी कारकीर्द डॉ. दीपक सावंत यांना मिळाली. जे अधिकारी शेट्टी यांच्या कार्यकाळात होते, तेच सावंत यांच्या अवतीभवती होते. याच कालावधीत २९० कोटींच्या औषध खरेदीचा घोटाळा पुढे आला. प्रकरण आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आहे. सावंतही सक्रिय राजकारणातून बाजूला गेले. त्यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राजेश टोपे आरोग्यमंत्री झाले. ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ असा मोठा कालावधी त्यांना मिळाला. याच काळात ‘कोविड’ची साथ आली. टोपे यांनी उत्तम काम केले; मात्र औषध खरेदीपासून ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. परिणामी या निवडणुकीत टोपे निवडूनही आले नाहीत. १४ ऑगस्ट २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२४ या काळात तानाजी सावंत आरोग्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ कसा गेला हे आता आपल्या लक्षात येईलच. तानाजी सावंत यांचा निसटता विजय झाला. शिवाय मंत्रिपद गेले ते गेले.

हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण आपण आता या खात्याचे मंत्री आहात. गोरगरीब, कष्टकरी माणूस सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा लाभार्थी आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. डॉक्टर गावात जातात की नाही? प्रश्नच आहे. सगळा कारभार रामभरोसे आहे. शिकलेले डॉक्टर औषध खरेदी आणि प्रशासनातच धन्यता मानतात. गोरगरीब रुग्ण उपचार मिळाले नाही तर ते कुठल्याही माध्यमांकडे आमच्या बातम्या छापा म्हणत तक्रार घेऊन जात नाहीत. समोर दिसणाऱ्या डॉक्टरांच्या हातापाया पडत उपचारांची भीक मागतात. हे वाचायला काहीसे त्रासदायक वाटत असले तरी कटू वास्तव आहे.

आपण ही व्यवस्था बदलू शकता. औषध खरेदीत रमणाऱ्या डॉक्टरांना रुग्ण तपासायला लावा. सगळ्यांना मुंबई, पुणे, ठाण्यातच पोस्टिंग हवे. अशांना गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली, बीड जिल्ह्यांमध्ये पाठवा. आरोग्य विभागाचेच ऑपरेशन करण्याची गरज आहे. आजही वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य हे दोन्ही विभाग आपापल्या पद्धतीने मनमानी खरेदी करत आहेत. त्यामुळे ठराविक कंपन्या एकच औषध दोन्ही विभागांना वेगवेगळ्या दराने देत आहेत. सबस्टँडर्ड दर्जाची औषधे आजही विदर्भातल्या वर्धा रुग्णालयाला पुरवण्यात आली हे ताजे उदाहरण आहे. स्वतःच्या पोस्टिंगसाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढणारे अधिकारी या विभागात होते. दिल्लीत जाण्या-येण्याचा, तिथल्या वकिलांचा खर्च किती? तो मिळणाऱ्या पगारातून भागतो का? याचाही हिशेब कधीतरी तपासा. वेळीच लक्ष घाला. गोरगरिबांचा तळतळाट चांगला नव्हे. आपल्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या म्हणून हे पत्र लिहिण्याची इच्छा झाली. यातील सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत असे समजू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने शहानिशा करा. हा विभाग चांगला चालला तर राज्यातल्या लाखो गोरगरिबांना चांगले आरोग्य लाभेल. त्यांचे आशीर्वाद तुमच्या कामी येतील. तुम्हाला शुभेच्छा..!

– तुमचाच बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *