जगातले नेते बदलले आपल्या नेत्यांचे काय?
कॅलिडोस्कोप / अतुल कुलकर्णी
काही वर्षांपूर्वी आलेली आणि प्रचंड गाजलेली मालिका म्हणजे ‘द क्राऊन’. ब्रिटनची राणी एलिझाबेथ राणी कशी झाली इथपासूनचा प्रवास या मालिकेत आहे. रोमहर्षक आणि ब्रिटनच्या राजकारणाची तपशीलवार माहिती देणारी व वेगवेगळे कंगोरे दाखवणारी ही मालिका आहे. तरुणपणी वडिलांच्या मृत्यूनंतर एलिझाबेथ यांना राणी पद देण्यात आले. त्यांची पहिली भेट तेव्हाचे पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांच्यासोबत झाली. चर्चिल जेव्हा पहिल्यांदा राणीला भेटायला जातात, तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याला भेटायला येत आहेत, याचे दडपण राणीच्या चेहऱ्यावर स्पष्ट असते. चर्चिल आणि एलिझाबेथचे वडील खूप चांगले मित्र असतात. त्यांची मुलगी राणी होते. त्यामुळे तिच्यापुढे वाकून नमस्कार करणे, सगळे प्रोटोकॉल पाळणे ही गोष्ट चर्चिल यांच्या अंगवळणी पडलेली नसते. मात्र त्यांच्यातला शिष्टाचार क्षणोक्षणी त्यांना याची जाणीव करून देतो.
विंस्टन चर्चिल येतात. राणीला लवून नमस्कार करतात. राणीचा हात हातात घेत त्याच्यावर हलकेच आपले ओठ टेकवतात. राणी त्यांना बसायला सांगते. चहा घेणार की कॉफी असेही विचारते. तेव्हा चर्चिल एकदम चमकून राणीकडे पाहतात आणि म्हणतात, पंतप्रधानांना कधीही चहा, कॉफी किंवा अन्य कोणत्या गोष्टीसाठी राणीने विचारायचे नसते. त्यांना कधी बसायलाही सांगायचे नसते. हा रिवाज तुमच्या आधीच्या पिढीने घालून दिलेला आहे. राणीला भेटून जाताना चर्चिल राणीला पाठ न दाखवता उलट्या पावली जातात…
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला होता. १९५२ साली त्या राणी बनल्या तेव्हा त्यांचे वय २५ वर्ष होते. त्यांचा मृत्यू ८ सप्टेंबर २०२२ रोजी झाला, त्या वेळी त्यांचे वय ९६ वर्षे होते. त्यांनी जवळपास ७० वर्षे ब्रिटनच्या राणी म्हणून राज्य केले. या कालावधीत राणीने १५ पंतप्रधान पाहिले. ज्या पद्धतीचे चर्चिल यांचे राणीसोबतचे वागणे होते ते पुढे पुढे कसे बदलत गेले हे बघणे हा या मालिकेत एक वेगळा अनुभव आहे. वेगवेगळे पंतप्रधान येतात. कमी जास्त कालावधीसाठी पदावर राहतात. राणी मात्र कायम असते. राज घराण्याचे आणि पंतप्रधानांचे बदलत जाणारे संबंध पहाणे हा देखील एक वेगळा अनुभव आहे. राणीच्या कालावधीतील आठवे आणि ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून मार्गारेट हिल्डा थॅचर यांची निवड होते. ब्रिटनच्या इतिहासात पंतप्रधान पद आणि राजघराण्यातील सर्वोच्च पद दोन्ही ठिकाणी महिला असतात. तो काळही या मालिकेत नजाकतीने दाखवलेला आहे.
मार्गारेट थॅचर यांचा मुलगा मार्क पॅरिस कार रॅलीत भाग घेतो. फ्रान्स मार्गे अर्जेनियाला जाताना तो कुठेतरी हरवतो. थॅचरबाई मुलाच्या शोधासाठी सरकार कामाला लावतात. त्याचवेळी त्या राणीला भेटायला जातात. राणी त्यांना ब्रिटनच्या ढासाळत चाललेल्या परिस्थितीवर जाब विचारतात. देशात महागाई १२ टक्क्यांनी वाढली आहे. बेरोजगारांची संख्या ३० लाखाने वाढली आहे. लोकांमध्ये राग आहे. दंगे होत आहेत. राणी हे बोलत असताना मार्गारेट थॅचर यांच्या डोळ्यात पाणी येते. आपला मुलगा सापडत नसल्याचे त्या राणीला सांगतात. तेव्हा राणी त्यांना ब्रँडी घेणार का विचारते. थॅचर बाई देखील व्हिस्की असेल तर चालेल असे सांगतात..! आणि राणी स्वतःच्या हाताने विस्कीचा ग्लास मार्गारेट थॅचरना देतात.
विंस्टन चर्चिल आणि मार्गरेट थॅचर या दोन पंतप्रधानांमधील संवाद आणि प्रसंग एवढ्यासाठी सविस्तर सांगितला की जगभरातले नेते, राजकारणी बदलत गेले. साहेबांच्या देशातील नेतेही बदलले. ज्या राणीकडे पाठ दाखवून जायचे नाही, असा संकेत असतो, त्याच राणी पंतप्रधानाला ग्लासात विस्की भरून देतात. काळामध्ये घडलेला एवढा बदल ही मालिका दाखवते. जगभरात हे बदल झाले त्याला आपण तरी कसे अपवाद असू…?
आपल्याकडे इंदिरा गांधींचा एक काळ होता. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री. त्यांचा एक काळ होता. नंतरच्या काळात अनेक मुख्यमंत्री झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने त्या पदाचा मान मरातब सांभाळला. मात्र गेल्या काही वर्षात आपले राजकीय नेते आपण जनतेच्या जवळ आहोत हे दाखवण्यासाठी सगळे संकेत गुंडाळून ज्या पद्धतीने वावरतात, इतर नेते मुख्यमंत्र्यांशी ज्या पद्धतीने वागतात, ते पाहिले तर त्याची तुलना जुन्या मुख्यमंत्र्यांसोबत केल्याशिवाय राहवत नाही. यशवंतराव चव्हाण साहित्यिकांमध्ये रमायचे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना एका अंध व्यक्तीचा त्यांच्या हातून नकळत अपमान झाला. तेव्हा त्यांनी त्याचे घेतलेले प्रयाश्चित्त याच महाराष्ट्राने अनुभवले आहे. विलासराव देशमुख कलावंतांवर ज्या पद्धतीने प्रेम करायचे त्याचे किस्से आजही अनेक जण सांगतात… या काही नोंद घेण्याजोग्या गोष्टी असल्या तरी राजकारण्यांचे आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे त्यांचे वागणे दिवसेंदिवस स्तर खाली आणणारे आहे. नेत्यांच्या भाषणांचा स्तर, वापरले जाणारे शब्द या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्र हा पुरोगामी होता की नव्हता यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते… जगभरातले नेते बदलत गेले तिथे आपण कोणाला दोष द्यायचा… वेळ काढून पुन्हा पुन्हा बघण्यासारखी क्राऊन मालिका या सगळ्या जाणिवा जागृत करते हेही नसे थोडके…
Comments